single-post

आझाद चौकातील हायमास्ट पुन्हा प्रकाशमान; व्यापाऱ्यांच्या मागणीला तातडीने प्रतिसाद

व्यापाऱ्यांच्या मागणीला तातडीचा प्रतिसाद; स्वखर्चातून हायमास्ट दिवे सुरू

18 September, 2026

आझाद चौकातील हायमास्ट पुन्हा प्रकाशमान; व्यापाऱ्यांच्या मागणीला तातडीने प्रतिसाद

कोरेगाव : गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला आझाद चौक येथील हायमास्ट पोलवरील प्रकाश पुन्हा सुरू करण्यात आला. व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीची दखल घेत कोरेगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष राहुल बर्गे व नगरसेवक साई बर्गे यांनी तातडीने कार्यवाही केल्याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आझाद चौक पुन्हा प्रकाशमय झाला आहे.

आझाद चौकातील हायमास्टवरील दिवे अनेक वर्षांपासून बंद असल्याने रात्रीच्या वेळी व्यापारी तसेच नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ वाढल्याने प्रकाशव्यवस्था सुरळीत करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी राहुल बर्गे व साई बर्गे यांच्याकडे केली.

व्यापाऱ्यांची समस्या समजताच बर्गे यांनी तातडीने संबंधित यंत्रणा बोलावून आज पहाटे साडेपाच वाजता हायमास्टची दुरुस्ती करून प्रकाशव्यवस्था सुरू केली. ही कार्यवाही स्वखर्चातून करण्यात आल्याचे राहुल बर्गे यांनी सांगितले.

हायमास्ट सुरू झाल्याने आझाद चौक परिसरातील व्यापारी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात चौक प्रकाशमान झाल्याने बाजारपेठेतील वातावरण अधिक उत्साही झाले आहे.

यावेळी राहुल बर्गे यांनी, “प्रश्न जुना असो अथवा नवा, जनतेचा प्रश्न ही आमची जबाबदारी आहे. नागरिकांनी समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे,” अशी भूमिका व्यक्त केली.

दरम्यान, आझाद चौकातील हायमास्टची प्रकाशव्यवस्था पूर्ववत झाल्याने व्यापारी व नागरिकांनी राहुल बर्गे आणि साई बर्गे यांचे आभार मानले.