single-post

प्रतिसरकार स्मारकस्थळी अतिक्रमणाचा प्रयत्न; कारवाईची मागणी

स्वातंत्र्य संग्राम विचार स्मारके समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; तातडीने चौकशीची मागणी जेसीबी आणून जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न; अधिकृत कागदपत्रे दाखविली नसल्याचा समितीचा आरोप ऐतिहासिक स्मारकाच्या जागेच्या संरक्षणासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी मर

09 September, 2026

Jarandeshwar samachar 

प्रतिसरकार स्मारकस्थळी अतिक्रमणाचा प्रयत्न; कारवाईची मागणी

सातारा : भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासातील सातारच्या प्रतिसरकारच्या शौर्यगाथेचे साक्षीदार असलेल्या स्मारकस्थळी अनधिकृतपणे जागा ताब्यात घेण्याचा तसेच तेथील बांधकामाची मोडतोड करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप स्वातंत्र्य संग्राम विचार स्मारके समितीने केला आहे. या प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

स्वातंत्र्य संग्राम विचार स्मारके समितीच्या वतीने बुधवारी (दि. ९) जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. पुणे विभागीय आयुक्त, महसूल आयुक्त, पुणे तसेच जिल्हाधिकारी, सातारा यांना हे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील ‘चले जाव’ चळवळीत सातारा प्रतिसरकारने बजावलेली भूमिका ऐतिहासिक आणि अभिमानास्पद आहे. या ऐतिहासिक स्मृती जतन करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या काळात १९९१-९२ या कालावधीत प्रतिसरकार स्मारकासाठी जागा आरक्षित करण्यात आली होती. ही जागा सातारा शहराच्या विकास आराखड्यातही समाविष्ट करण्यात आल्याचे समितीने निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, मराठी साहित्य संमेलनाच्या काळात स्मारकस्थळाची भिंत तोडून तेथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्याची तक्रार यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्य परिवहन मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडून या जागेवर तात्पुरते बसस्थानक उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप समितीने केला आहे.

बुधवारी सकाळी १० ते १२ या वेळेत स्वातंत्र्य संग्रामप्रेमी नागरिक व सामाजिक कार्यकर्ते स्मारकस्थळी उपस्थित होते. यावेळी काही व्यक्ती जेसीबी व इतर साहित्य घेऊन स्मारकस्थळाची जागा ताब्यात घेण्याचा व तेथील बांधकामात पाडकाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले. उपस्थितांनी संबंधितांकडे या कामाची वैधता व अधिकृत कागदपत्रे मागितली असता कोणतीही कागदपत्रे दाखविण्यात आली नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

स्मारकस्थळाची ऐतिहासिकता व स्वातंत्र्य संग्रामातील योगदान लक्षात घेता या ठिकाणी कोणतेही अनधिकृत बांधकाम, पाडकाम किंवा जागेचा वापर करण्यास परवानगी देऊ नये. संबंधित प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच प्रतिसरकार स्मारक प्रकल्पाच्या पुढील विकासकामांना प्रशासनाने आवश्यक ते सहकार्य करावे, अशी मागणी समितीने केली आहे.

निवेदनावर सुनील काळेकर, महारुद्र तिकुंडे, गणेश अहिवळे, विजय निकम, शिवाजी जाधव, अस्लम तडसरकर, कैलास कुंभार, प्रशांत जाधव, सुमित वाहन, राजुशेठक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.