single-post

सातारा जिल्हा परिषदेत उत्साहात अभियंता दिन साजरा

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांसाठी ‘आदर्श अभियंता पुरस्कार’ जाहीर

15 September, 2026

जरंडेश्वर समाचार 

सातारा, दि. १५ जरंडेश्वर समाचार वृत्त जनससेवा : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा अभियंता दिन सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या प्रांगणात मंगळवारी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेत अभियंत्यांचे योगदान अधोरेखित करताना उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाखा अभियंत्यांचा गौरव करण्यासाठी लवकरच ‘आदर्श अभियंता पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजूभैया भोसले यांनी केली.

अभियंता दिनानिमित्त जिल्हा परिषद परिसराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियंता अंकिता सुतार यांनी केले. सूत्रसंचालन अभियंता विजय खामकर यांनी केले. जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे अध्यक्ष अभियंता कृष्णात फडतरे यांनी सर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनकार्याचा आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला.

देशाच्या पायाभूत विकासाला दिशा देताना विश्वेश्वरय्या यांनी दाखविलेली दूरदृष्टी, नियोजनबद्ध कार्यपद्धती, शिस्त आणि तांत्रिक कौशल्य आजच्या पिढीतील अभियंत्यांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे फडतरे यांनी सांगितले. केवळ बांधकामाची अंमलबजावणी न करता उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर, गुणवत्तेचे निकष आणि वेळेचे नियोजन यांनाही विकासकामांमध्ये महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजूभैया भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी मा. खलीपे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बांधकाम विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता संजय खोत, बांधकाम विभाग दक्षिणचे कार्यकारी अभियंता विद्याधर शिंदे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता शेजवळ, मृदा व जलसंधारण विभागाचे अभियंता कुंभार यांच्यासह जिल्हा परिषदेतील उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उत्कृष्ट कार्याची दखल घेणार

ग्रामीण भागातील विकासकामांची आखणी आणि अंमलबजावणीमध्ये अभियंत्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. रस्ते, पूल, शासकीय इमारती, शाळा, आरोग्य केंद्रे, पाणीपुरवठा योजना तसेच जलसंधारणाच्या विविध प्रकल्पांमध्ये अभियंते तांत्रिक जबाबदारी पार पाडतात. या कामात गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि उपलब्ध निधीचा कार्यक्षम वापर यांचा समतोल राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असते.

याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमध्ये उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या शाखा अभियंत्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘आदर्श अभियंता पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे राजूभैया भोसले यांनी सांगितले. या पुरस्काराचे वितरण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई आणि नामदार मकरंदआबा पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

अभियंत्यांच्या कामाची सार्वजनिक पातळीवर दखल घेतली गेल्यास त्यातून अन्य कर्मचाऱ्यांनाही चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. ग्रामीण भागातील विकासाचा वेग वाढविण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळाची कार्यक्षमता आणि जबाबदारीची जाणीव महत्त्वाची असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

अभियंता दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात अभियंता बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. विकासकामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि लोकहिताला प्राधान्य देत कार्य करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाची सांगता अभियंत्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला आहे .