single-post

कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीचे पडघम; इच्छुकांच्या बैठकांना वेग

नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली; शक्तिप्रदर्शनासह मोर्चेबांधणीला सुरुवात

12 September, 2026

कोरेगाव दि.१३ ऑगस्ट २०२६ : कोरेगाव नगरपंचायतीची मुदत ९ फेब्रुवारी २०२७ रोजी संपणार असली, तरी त्यापूर्वीच आगामी नगरपंचायत निवडणुकीचे पडघम शहरात वाजू लागले आहेत. निवडणुकीला अद्याप काही महिने बाकी असताना इच्छुक उमेदवारांच्या बैठका, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. विशेषतः नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होणार असल्याने आणि हे पद खुल्या प्रवर्गासाठी असल्याच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.

नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या इच्छुकांकडून विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांकडे उमेदवारीसाठी चाचपणी सुरू आहे. त्याचबरोबर आपापला जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे बळ दाखविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. वाढदिवस, स्नेहमेळावे, कार्यकर्त्यांच्या बैठका, सहली तसेच भोजनावळींच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन सुरू असल्याचे दिसून येत आहे.

याच पार्श्वभूमीवर शहरातील डी.पी. भोसले कॉलेजजवळील एका सभागृहात काल एका इच्छुक उमेदवाराच्या समर्थकांची बैठक झाली. या बैठकीस सुमारे ३०० प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीमध्ये संबंधित इच्छुक उमेदवाराने कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आगामी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची भूमिका जाहीर केली.

यावेळी ‘पक्षाने उमेदवारी दिली तर पक्षासोबत, मात्र उमेदवारी न मिळाल्यास पक्षाबाहेर राहून निवडणूक लढविण्याची तयारी’ असल्याचा सूर बैठकीत व्यक्त करण्यात आला. त्यामुळे या बैठकीची चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात रंगली आहे. तथापि, अधिकृत उमेदवारी आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच अंतिम राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, काही राजकीय जाणकारांच्या मते उमेदवारीबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास पुढील भूमिका घेणे, हा त्यानंतरचा निर्णय असावा, असे मतही व्यक्त होत आहे. दुसरीकडे, अन्य इच्छुकांकडूनही सावधपणे मोर्चेबांधणी सुरू असून प्रत्येकजण आपली राजकीय ताकद आजमावताना दिसत आहे.

बैठकीमध्ये काही कार्यकर्त्यांनी स्थानिक राजकीय परिस्थितीवर टीकास्त्र सोडत आगामी निवडणूक संघर्षमय होण्याचे संकेत दिले. कार्यकर्त्यांच्या भाषणांमधून आणि चर्चेतून आपापल्या नेतृत्वाला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त झाला. त्यामुळे आगामी निवडणुकीत स्थानिक पातळीवर मोठी राजकीय चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, निवडणूक जवळ येण्यापूर्वीच शहरातील विविध भागांत सामाजिक व संपर्क उपक्रमांनाही वेग आला आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना साड्यांचे वाटप, वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांसाठी भोजनाचे आयोजन तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात असल्याची चर्चा शहरात आहे. या माध्यमातून इच्छुक उमेदवारांकडून मतदारांशी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते.

अनुसूचित जाती आरक्षणाच्या मागणीने चर्चेला नवा विषय

दरम्यान, कोरेगावच्या नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाचाही मुद्दा चर्चेत आला आहे. कोरेगाव ग्रामपंचायतीपासून नगरपंचायतीपर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडात अनुसूचित जाती प्रवर्गाला सरपंच अथवा नगराध्यक्षपदाची पूर्ण मुदतीची संधी मिळाली नसल्याचा दावा काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर आगामी नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुढे येत आहे. सध्या खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणाबाबतही फेरविचार व्हावा, अशी भूमिका काही जण व्यक्त करीत आहेत.

मात्र, नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे संबंधित कायदे, आरक्षणाचे चक्र, उपलब्ध अधिसूचना आणि निवडणूक आयोगाच्या अधिकृत प्रक्रियेनुसार निश्चित होते. त्यामुळे आरक्षणाबाबत अंतिम निर्णय अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याची तयारी असल्याची चर्चाही शहरात सुरू आहे.

एकूणच, निवडणुकीला काही महिने बाकी असतानाच कोरेगावमध्ये इच्छुकांची मोर्चेबांधणी, कार्यकर्त्यांच्या बैठका, शक्तिप्रदर्शन, उमेदवारीसाठी पक्षीय पातळीवर सुरू असलेली चाचपणी आणि नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची चर्चा यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. आगामी काळात कोणाला पक्षाची पसंती मिळणार आणि कोण स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, याकडे कोरेगावकरांचे लक्ष लागले आहे.