अखेर कोरेगाव नगरपंचायतीला जाग; धोकादायक खड्डा बुजविण्याच्या कामाला सुरुवात
नागरिकांच्या तक्रारी, आंदोलन आणि ‘जरंडेश्वर समाचार’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; अनेक अपघातांनंतर नगरपंचायतीकडून कार्यवाही
10 September, 2026
जरंडेश्वर समाचार
कोरेगाव दि.१० ऑगस्ट २०२६ जरंडेश्वर समाचार वृत्तजन सेवा : शहरातील आझाद चौक ते बाजारपेठ मार्गे शिवनेरी कॉलनी ,दि.मॉडर्न हायस्कूलच्या पाठीमागील रस्ता या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय, हायस्कूल-कॉलेज, प्रांत कार्यालय व तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर म्हणजे शिवनेरी कॉलनी जवळ ब्रिजला पडलेला भला मोठा खड्डा अखेर बुजविण्याच्या कामाला कोरेगाव नगरपंचायतीने सुरुवात केली आहे. गुरुवार, दि. १० सप्टेंबर रोजी या खड्ड्याच्या भरावाचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.खड्डा मुजवल्याबद्दल नगरपंचायतीचे आभार!
मात्र, या खड्ड्यामुळे गेल्या काही दिवसांत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. खड्ड्यात पडून अनेक दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना घडल्या असून, एका महिलेलाही या खड्ड्यामुळे दुखापत झाली. दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचेही अपघात झाले. काही दुचाकींच्या हेडलाईटचे नुकसान झाले, तर वाहनांचे अन्य नुकसान झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या.
या धोकादायक खड्ड्याकडे कोरेगाव नगरपंचायतीचे लक्ष वेधण्यासाठी ‘साप्ताहिक जरंडेश्वर समाचार’ने सातत्याने आवाज उठविला होता. तसेच आरपीआयचे तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी यांनी याबाबत आंदोलन केले होते.नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करून खड्डा तातडीने बुजविण्याची मागणी करण्यात आली होती. काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही या प्रश्नावर आंदोलनाचा मार्ग स्वीकारत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
खड्डा बुजविण्यासाठी वारंवार मागणी करूनही कार्यवाही होत नसल्याने अखेर ‘जरंडेश्वर समाचार’च्या माध्यमातून नगरपंचायतीला दि. ५ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आले होते. या मुदतीत खड्डा बुजविण्यात न आल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.
मुदत उलटून गेल्यानंतरही काही दिवस खड्ड्याचा प्रश्न कायम राहिला. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. अखेर नगरपंचायतीने या खड्ड्याची दखल घेत गुरुवार, दि. १० सप्टेंबर रोजी भरावाचे काम सुरू केले.
वर्दळीच्या मार्गावर कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज
आझाद चौक, बाजारपेठ, शिवनेरी कॉलनी, मॉडर्न हायस्कूल, ग्रामीण रुग्णालय, विविध शैक्षणिक संस्था, प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालय या महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावर दिवसभर मोठी वर्दळ असते.
खड्डा बुजविण्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी, केवळ भराव करून न थांबता रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती व दर्जेदार डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
दरम्यान, या प्रश्नाबाबत कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या निदर्शनासही हा विषय आणण्यात आला होता. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
पाठपुराव्याला अखेर यश
धोकादायक खड्ड्यामुळे नागरिकांना होणारा त्रास, अपघात आणि वाहनांचे नुकसान याबाबत सातत्याने वृत्त प्रसिद्ध करून ‘जरंडेश्वर समाचार’ने हा प्रश्न लावून धरला होता. सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनीही प्रशासनाकडे पाठपुरावा केला. अखेर या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर नगरपंचायतीला जाग आली असून खड्डा बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आता खड्ड्याचा तात्पुरता भराव न करता रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती कधी होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय