single-post

शिवनेरी कॉलेजजवळील खोल खड्डा धोकादायक; दुचाकीचा अपघात

यापूर्वी आमदार महेश शिंदे यांच्या निदर्शनास विषय; विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

25 August, 2026

शिवनेरी कॉलेजजवळील खोल खड्डा धोकादायक; दुचाकीचा अपघात

यापूर्वी आमदार महेश शिंदे यांच्या निदर्शनास विषय; विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

कोरेगाव, दि. २५ जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:- कोरेगाव शहरातील शिवनेरी कॉलनी जवळील रस्त्यावर निर्माण झालेला आकाराने फार मोठा नसला, तरी खोल असलेला खड्डा वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. मंगळवारी (दि. २५) सकाळी सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी दुचाकीस्वाराला खड्डा चुकविताना पिकअप वाहनाला धडक बसल्याची घटना घडली. या घटनेत दुचाकीच्या हेडलाईटचे नुकसान झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

या खड्ड्याबाबत यापूर्वीच आमदार महेश शिंदे यांच्या कानावर विषय घालण्यात आला होता. मात्र, अद्याप या ठिकाणी अपेक्षित दुरुस्ती झालेली नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमदारांनी संबंधित नगरपंचायतीला याबाबत सूचना केल्या आहेत का, सूचना करूनही कार्यवाही प्रलंबित आहे का, याबाबत संबंधित प्रशासनाने स्पष्टता देण्याची गरज आहे.

डी.पी.भोसले कॉलेज तसेच द मॉडर्न हायस्कूलकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची या मार्गावरून मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्याचबरोबर प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय तसेच अन्य शासकीय कार्यालयांकडे जाणारे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकही या मार्गाचा वापर करतात. सुभाषनगर व सुलतानवाडे परिसरातील नागरिक बाजारपेठ व भाजी मंडईकडे जाण्यासाठी याच मार्गाने ये-जा करतात.

त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर मोठी वर्दळ असते. खड्डा आकाराने मोठा नसला तरी त्याची खोली आणि रस्त्यावरची स्थिती पाहता दुचाकीस्वारांसाठी तो धोकादायक ठरू शकतो. विशेषतः समोरून किंवा बाजूने वाहन येत असताना खड्डा चुकविण्याचा प्रयत्न केल्यास अपघाताची शक्यता निर्माण होते.

जुन्या पुलावरील भगदाडही धोकादायक

शिवनेरी कॉलेज आणि काटेवस्ती परिसरादरम्यान असलेल्या जुन्या छोट्या पुलाजवळही रस्त्याच्या भागात भगदाड निर्माण झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या ठिकाणी दगड टाकून तात्पुरता भराव करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हा कायमस्वरूपी उपाय नसल्याने संबंधित यंत्रणेने या ठिकाणाची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

अपघात प्रत्यक्ष डोळ्यांसमोर

‘जरंडेश्वर समाचार’च्या रीलसाठी या परिसराची पाहणी आणि चित्रीकरण सुरू असताना मंगळवारी सकाळी सुमारे ११.४५ वाजता हा प्रकार प्रत्यक्ष डोळ्यांसमोर घडला. खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकी पिकअप वाहनाच्या दिशेने गेली आणि धडक झाली. या घटनेत दुचाकीची हेडलाईट फुटली.

या घटनेचे चित्रीकरण करण्यात आले असून, रस्त्यावरील खड्डा आणि त्यातून वाहनचालकांना मार्ग काढताना होणारी अडचणही या दृश्यांमध्ये दिसून येते.

‘रस्ता नंतर होईल; खड्डा तरी तातडीने बुजवा’

रस्त्याचे कायमस्वरूपी काम होण्यास वेळ लागणार असल्यास संबंधित यंत्रणेने किमान तात्पुरती दुरुस्ती करून हा खड्डा सुरक्षित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची, नागरिकांची आणि वाहनचालकांची मोठी वर्दळ असलेल्या या मार्गावर एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची वाट पाहण्यापेक्षा त्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

लोकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन कोरेगाव नगरपंचायतीने या ठिकाणी तातडीने पाहणी करावी, खड्डा बुजवावा आणि रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

यापूर्वी हा विषय लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देण्यात आला असल्याने आता संबंधित प्रशासन या प्रश्नावर काय कार्यवाही करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.