single-post

कोरेगावात ८ सप्टेंबरला संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव

नाभिक समाजासाठी उभारलेल्या नूतन सामाजिक सभागृहात विविध कार्यक्रम; आमदार महेशदादा शिंदे यांच्यासह मान्यवरांचा जाहीर सत्कार

02 September, 2026

जरंडेश्वर समाचार 

कोरेगाव दि.२ सप्टेंबर २०२६ जरंडेश्वर वृत्त जनससेवा : कोरेगाव शहर व तालुक्यातील नाभिक समाजाच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळ्याचे आयोजन मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. यंदाचा पुण्यतिथी उत्सव नाभिक समाजासाठी जागेसह उभारण्यात आलेल्या श्री संत सेना महाराज सामाजिक सभागृहात प्रथमच आयोजित करण्यात येणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कोरेगाव नगरपंचायतीचे सर्व पदाधिकारी व नगरसेवक यांचा यावेळी जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता सुश्राव्य भजनाने होणार असून सकाळी ११.३० वाजता जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता संत सेना महाराजांच्या प्रतिमेस पुष्पांजली व आरती होणार आहे. दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाप्रसादाचे सौजन्य श्री. लक्ष्मण मारकड (लकी व्हरायटीज्, कोरेगाव) यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम श्री संत सेना महाराज सभागृह, नाना-नानी पार्क, डी.पी. कॉलेजजवळ, कोरेगाव येथे होणार आहे.

समाजातील महिला व ज्येष्ठ नागरिकांना कार्यक्रमस्थळी येणे सुलभ व्हावे यासाठी कोरेगाव पोलीस स्टेशनपासून कार्यक्रमस्थळापर्यंत वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शहर व तालुक्यातील सर्व नाभिक समाजबांधवांनी सहकुटुंब उपस्थित राहून संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री विठ्ठल भक्त संत सेना महाराज मंदिर नियोजन मंडळ, कोरेगाव तसेच कोरेगाव शहर व तालुक्यातील सर्व नाभिक समाजबांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.