single-post

आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासात माध्यमांची भूमिका महत्त्वाची

धाराशिवमध्ये PIBच्या ‘वार्तालाप’ माध्यम परिषदेत शाश्वत शेती, आधुनिक तंत्रज्ञानावर मंथन शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे आवाहन; अणुतंत्रज्ञान, कृषी विज्ञान केंद्र आणि मधुमक्षिकापालनाच्या आधुनिक पद्धतींची माहिती

02 September, 2026

जरंडेश्वर समाचार 

धाराशिव | 2 सप्टेंबर २०२६ जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा: धाराशिवमध्ये PIBच्या ‘वार्तालाप’ माध्यम परिषदेत शाश्वत शेती, आधुनिक तंत्रज्ञानावर मंथन

शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे आवाहन; अणुतंत्रज्ञान, कृषी विज्ञान केंद्र आणि मधुमक्षिकापालनाच्या आधुनिक पद्धतींची माहिती:
आकांक्षित जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या योजना आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सकारात्मक आणि विकासाभिमुख पत्रकारितेच्या माध्यमातून शेतीतील यशोगाथा समाजासमोर आणल्यास शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल, असे प्रतिपादन धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी केले.

केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील पत्र सूचना कार्यालय (PIB), मुंबई यांच्या वतीने धाराशिव येथे पत्रकारांसाठी ‘वार्तालाप’ माध्यम परिषद व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ‘आकांक्षित जिल्ह्यांसाठी शाश्वत शेतीचे सुलभीकरण’ या प्रमुख विषयावर आयोजित कार्यशाळेत शाश्वत शेती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, अणुतंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रातील वापर, मधुमक्षिकापालन तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, PIBचे माहिती व संचार अधिकारी हर्षल आकुडे, माहिती सहायक एडगर कोएल्हो यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, तज्ज्ञ आणि जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

शेतीपूरक व्यवसायातून उत्पन्नवाढीवर भर

अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी पुजार यांनी शाश्वत आणि सर्वसमावेशक कृषी पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले. शेतीसोबतच कुक्कुटपालन, शेळीपालन आणि मधुमक्षिकापालन यांसारखे शेतीपूरक व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

स्थानिक शेतकरी आणि ग्रामीण समुदायांच्या आर्थिक उन्नतीसाठी आधुनिक तसेच शाश्वत कृषी पद्धतींचा स्वीकार आवश्यक आहे. शासनाच्या योजना, कृषी क्षेत्रातील नव्या संधी आणि यशस्वी प्रयोगांची माहिती माध्यमांनी प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

“धाराशिवसारख्या आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,” असे जिल्हाधिकारी पुजार यांनी स्पष्ट केले.

शाश्वत आणि सेंद्रिय शेतीतून जिल्ह्याच्या विकासाला गती

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी ग्रामीण विकासासाठी अशा प्रकारच्या माध्यम कार्यशाळांचे महत्त्व अधोरेखित केले.

धाराशिव हा नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत समाविष्ट जिल्हा असून, शाश्वत व सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

अणुतंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रासाठी उपयोग

कार्यशाळेतील तांत्रिक सत्रात भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागातील (DAE) तज्ज्ञांनी कृषी व अन्न तंत्रज्ञानामध्ये आधुनिक अणुतंत्रज्ञानाच्या वापराबाबत पत्रकारांना माहिती दिली.

न्यूक्लियर ॲग्रीकल्चर अँड बायोटेक्नॉलॉजी डिव्हिजनचे सायंटिफिक ऑफिसर ‘G’ डॉ. विनोद जे. ढोले यांनी पिकांच्या सुधारित व रोगप्रतिकारक वाणांची निर्मिती, तसेच कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी अणुतंत्रज्ञानाचा कसा उपयोग केला जातो, याबाबत सविस्तर माहिती दिली.

अन्न तंत्रज्ञान विभागाचे सचिन हजारे यांनी रेडिएशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अन्नधान्य व फळांची साठवणूक क्षमता वाढविणे, अन्नसुरक्षा मजबूत करणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संधी वाढविण्याबाबत माहिती दिली.

शेतापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यात KVKची भूमिका

कृषी विज्ञान केंद्राचे (KVK) शास्त्रज्ञ डॉ. सचिन सूर्यवंशी यांनी ‘कृषी विस्तार सेवांच्या प्रसारात कृषी विज्ञान केंद्राची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले.

प्रयोगशाळेतील वैज्ञानिक संशोधन आणि प्रत्यक्ष शेतकरी यांच्यातील दरी कमी करून आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान आणि सुधारित पीक पद्धती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात कृषी विज्ञान केंद्र महत्त्वाचा दुवा असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची क्षमता वाढविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.

मधुमक्षिकापालनातून रोजगाराच्या नव्या संधी

केंद्रीय मधुमक्षी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (CBRTI) प्रशिक्षण समन्वयक राहुल काळे यांनी शास्त्रीय पद्धतीने बॉक्समधील मधमाशीपालन आणि फुलोरा व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले.

प्रशिक्षण आणि सूक्ष्मदर्शकीय परागकण विश्लेषणाच्या माध्यमातून मधमाशीपालकांना शुद्ध मधाचे उत्पादन घेता येते. तसेच मधातील भेसळ रोखण्यास मदत होत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी लातूर येथील मधपाळ ज्ञानेश्वर मलिले यांनी आपले अनुभवकथन केले. CBRTIच्या सहकार्याने त्यांनी लातूर मधुशाळा आणि भगीरथ मधु केंद्र उभारले असून, या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात PIBचे योगदान

PIB पुणे येथील माध्यम व संचार अधिकारी हर्षल आकुडे यांनी पत्र सूचना कार्यालयाची कार्यपद्धती, केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात PIBची भूमिका आणि पत्रकारांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सेवा व सुविधांची माहिती दिली.

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी रघुनाथ जाधव तसेच ‘लखपती दीदी’ अनिता देवकडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत संबंधित योजनांमुळे झालेल्या लाभांविषयी आपले अनुभव मांडले.

पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग

कार्यशाळेच्या समारोपावेळी PIB मुंबईचे माहिती सहायक एडगर कोएल्हो यांनी उपस्थित मान्यवर, तज्ज्ञ वक्ते आणि माध्यम प्रतिनिधींचे आभार मानले. सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले.

कार्यशाळेस धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, माध्यम प्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

— PIB मुंबई | हर्षल आकुडे / दर्शना राणे