काटे वस्तीसमोरील धोकादायक खड्डा तातडीने बुजवा; अन्यथा ५ सप्टेंबरनंतर आंदोलनाचा इशारा
शिवनेरी कॉलनी, कॉलेज, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय व ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील खड्ड्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
01 September, 2026
काटे वस्तीसमोरील धोकादायक खड्डा तातडीने बुजवा; अन्यथा ५ सप्टेंबरनंतर आंदोलनाचा इशारा
शिवनेरी कॉलनी, कॉलेज, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय व ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील खड्ड्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कोरेगाव १ सप्टेंबर २०२६ जरंडेश्वर समाचार वृत्त जनससेवा: कोरेगाव शहरातील शिवनेरी कॉलेजजवळील काटे वस्तीसमोरील छोट्या पुलावर पडलेला मोठा खड्डा नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून, या खड्ड्याची तातडीने दुरुस्ती करून तो बुजवावा, अशी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सुरेश बोतालजी यांनी केली आहे.
हा मार्ग प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय तसेच शैक्षणिक संस्थांकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसभर विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दुचाकीस्वार तसेच इतर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र पुलावरील खड्ड्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी या ठिकाणी पुरेसा प्रकाश नसल्याने खड्डा वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनांचे नियंत्रण सुटण्याची शक्यता असून, यापूर्वी या ठिकाणी अनेक जण घसरून किंवा वाहनांवरून पडल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. एका महिलेलाही या खड्ड्यामुळे दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
“मी या ठिकाणी बातमीचे चित्रीकरण करत असताना माझ्या डोळ्यांसमोरच खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात एका पिकअपला दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीची हेडलाईट फुटली. ही घटना माझ्यासमोर घडली आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ बातमीचा नसून नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षिततेचा आहे,” असे सुरेश बोतालजी यांनी सांगितले.
या प्रश्नासंदर्भात यापूर्वीही बातम्या प्रसिद्ध करून कोरेगाव नगरपंचायतीचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र अद्याप खड्ड्याची कायमस्वरूपी दुरुस्ती झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
५ सप्टेंबरपर्यंतची अंतिम मुदत
५ सप्टेंबर २०२६ पर्यंत हा खड्डा बुजवून रस्त्याची सुरक्षितपणे दुरुस्ती न केल्यास, या खड्ड्याभोवती रांगोळी काढून त्यामध्ये वृक्षारोपण करण्याचे अनोखे आंदोलन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येईल, असा इशारा सुरेश बोतालजी यांनी दिला आहे.
ते म्हणाले, “लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठविणे हे पत्रकार म्हणून माझे कर्तव्य आहे. कितीही बातम्या प्रसिद्ध झाल्या तरी त्याचा परिणाम होत नसेल, तर लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. मला आंदोलनापर्यंत जाण्याची वेळ नगरपंचायतीने आणू नये, हीच माझी विनंती आहे.”
‘एक खड्डा’ प्रशासनाच्या उदासीनतेचे प्रतीक होऊ नये
शहरातील रस्ते, खड्डे, पथदिवे, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. प्रशासनाने या तक्रारींकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
“शेवटी लोकांपेक्षा मोठे कोणीही नाही. नागरिकांना त्रास होत असेल तर त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणे आवश्यक आहे. कोरेगाव शहरातील प्रत्येक भागात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार असून, त्यासाठी आवश्यक ते लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल,” असेही बोतालजी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आगामी काळात नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न अधिक तीव्रतेने मांडले जातील. प्रशासनाने वेळेत कार्यवाही करून नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये, एवढीच अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
“५ सप्टेंबर ही या खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी दिलेली अंतिम मुदत आहे. त्यानंतरही कार्यवाही झाली नाही, तर ग्रामस्थांना सोबत घेऊन लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा सुरेश बोतालजी यांनी दिला.
— सुरेश बोतालजी, पत्रकार

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय