सातारा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिर; २४ ऑगस्टला विविध आजारांचे मोफत निदान
मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार व गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे लवकर निदान; विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची विभागनिहाय आरोग्य तपासणी
20 August, 2026
सातारा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिर; २४ ऑगस्टला विविध आजारांचे मोफत निदान
जरंडेश्वर समाचार वृत्तसेवा
सातारा : जिल्हा परिषद सातारा येथे कार्यरत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने येत्या सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) हे शिबिर होणार असून, यात असंसर्गजन्य आजारांसह विविध गंभीर आजारांचे प्राथमिक टप्प्यातच निदान करण्यावर भर दिला जाणार आहे.
खाजगी वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाद्वारे ही तपासणी केली जाणार असून, कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणे आणि वेळेत योग्य उपचार उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
गंभीर आजारांसाठी विशेष चाचण्या
या शिबिरात ३० वर्षांवरील व उच्च-जोखमीच्या कर्मचाऱ्यांसाठी 'uACR' टेस्टद्वारे मूत्रपिंड विकाराचे (CKD) लवकर निदान केले जाईल. तसेच ३० वर्षांवरील महिला कर्मचाऱ्यांसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी 'HPV मॉलिक्युलर डीएनए स्क्रीनिंग' केले जाणार आहे. याशिवाय १८ वर्षांवरील सर्व कर्मचाऱ्यांसाठी ईसीजी (ECG) सुविधा, तर सर्व वयोगटांतील कर्मचाऱ्यांसाठी हिमोग्लोबिन, रक्तदाब आणि शुगर तपासणी केली जाणार आहे.
कामकाज न थांबवता विभागनिहाय नियोजन
कार्यालयीन कामाचा खोळंबा होऊ नये आणि गर्दी टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते १०.३० या वेळेत पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तपासणी होईल. सकाळी १०.३० ते ११.३० दरम्यान समाजकल्याण, लघुपाटबंधारे, आरोग्य व बांधकाम (दक्षिण) विभागाचे कर्मचारी उपस्थित राहतील.
त्यानंतर ११.३० ते १२.३० या वेळेत शिक्षण (प्राथमिक), अर्थ, महिला व बाल कल्याण विभाग, तर दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत कृषी, पशुसंवर्धन व बांधकाम (उत्तर) विभागातील कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाईल. दुपारी १.३० ते २.३० या सत्रात सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत व शिक्षण (माध्यमिक) आणि दुपारी २.३० ते ३.३० या अंतिम सत्रात पाणी, स्वच्छता व अन्य उर्वरित विभागांतील कर्मचाऱ्यांची तपासणी पार पडेल.
कर्मचाऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
नियमित तपासणीमुळे आजारांचे वेळेत निदान होऊन पुढील गंभीर धोका टळू शकतो. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या शिबिरात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शिबिरामुळे अत्यावश्यक कार्यालयीन कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश सर्व विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय