single-post

निरोगी अधिकारी-कर्मचारी, सक्षम जिल्हा परिषद; २३२ जणांची आरोग्य तपासणी

जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिर; १४५ पुरुषांसह ८७ महिलांची तपासणी ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ उपक्रमांतर्गत आयोजन; मधुमेह, रक्तदाब, ईसीजीसह विविध तपासण्या कामाच्या ताणातून आरोग्याला दिलासा; अधिकारी-कर्मचाऱ्यांची दरवर्

24 August, 2026

निरोगी अधिकारी-कर्मचारी, सक्षम जिल्हा परिषद; २३२ जणांची आरोग्य तपासणी

सातारा, दि. २४ (जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा): महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत सातारा जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे आणि उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती राजूभैया भोसले यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातून हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १४५ पुरुष व ८७ महिला, अशा एकूण २३२ अधिकारी-कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

महिला विभागाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या हस्ते, तर पुरुष विभागाचे उद्घाटन उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती राजूभैया भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. लीना बेंडाळे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिबिरामध्ये दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराचे निदान करण्यासाठी UACR टेस्ट, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, उच्च रक्तदाब, हिमोग्लोबीन, ईसीजी, मधुमेह आदी विविध तपासण्या करण्यात आल्या. कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड तसेच सिव्हिल हॉस्पिटल, सातारा येथील तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांची तपासणी केली.

दैनंदिन कामकाजाच्या व्यापामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. कामाचा ताण, धावपळ आणि बदलती जीवनशैली यामुळे विविध आजारांचा धोका वाढत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीला विशेष महत्त्व असून, आजाराचे वेळेत निदान झाल्यास पुढील गंभीर धोके टाळता येतात. या उद्देशाने जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांची दरवर्षी नियमित आरोग्य तपासणी करण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांना सातत्य देण्याचा प्रयत्न असल्याचे राजूभैया भोसले यांनी सांगितले.

“जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दिवसभराच्या कामकाजाचा मोठा ताण असतो. या कामाच्या ताणातून त्यांना आरोग्याच्या दृष्टीने दिलासा मिळावा, तसेच कोणताही आजार सुरुवातीच्या टप्प्यातच निदर्शनास यावा, यासाठी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. अधिकारी-कर्मचाऱ्यांची दरवर्षी आरोग्य तपासणी व्हावी, यासाठीही प्रयत्न करण्यात येतील. स्वतःचे आरोग्य जपणारा कर्मचारीच अधिक सक्षमपणे समाजाची सेवा करू शकतो,” असे जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती राजूभैया भोसले यांनी सांगितले.

तपासणीनंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पुढील उपचार किंवा वैद्यकीय तपासणीची आवश्यकता असल्यास त्याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी सल्ला दिला. या उपक्रमामुळे जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीबाबत जागरूकता निर्माण झाली

“आरोग्य तपासणी ही आजार शोधण्यापुरती मर्यादित नसून, आजारापासून स्वतःचा बचाव करण्याची पहिली पायरी आहे. दैनंदिन कामकाजाच्या व्यापात अधिकारी-कर्मचारी अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. काही आजारांची लक्षणे सुरुवातीला जाणवतही नाहीत. त्यामुळे नियमित तपासणी, वेळेत निदान आणि आवश्यक उपचार यांना महत्त्व आहे. जिल्हा परिषद कुटुंबातील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी निरोगी आणि सक्षम राहावा, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश आहे.”

डॉ. प्रिया शिंदे, अध्यक्षा, सातारा जिल्हा परिषद

“अनेक आजार शरीरात असतात; मात्र त्याची जाणीव संबंधित व्यक्तीला नसते. नियमित आरोग्य तपासणीमुळे अशा आजारांचे वेळीच निदान होऊन पुढील गंभीर धोका टाळता येतो. ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ ही संकल्पना राबविताना जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. निरोगी आणि सक्षम अधिकारी-कर्मचारीच अधिक प्रभावीपणे जनतेची सेवा करू शकतात.”

राजूभैया भोसले, उपाध्यक्ष तथा सभापती, आरोग्य समिती, सातारा जिल्हा परिषद