लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा साताऱ्यातील पुतळा 'कलात्मकदृष्ट्या' चुकीचा!
ख्यातनाम शिल्पकाराकडून नव्याने उभारणी करण्याची मागणी; सकल मातंग समाज, आंबेडकरवादी संघटना आक्रमक
11 March, 2026
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा साताऱ्यातील पुतळा 'कलात्मकदृष्ट्या' चुकीचा!
ख्यातनाम शिल्पकाराकडून नव्याने उभारणी करण्याची मागणी; सकल मातंग समाज, आंबेडकरवादी संघटना आक्रमक
सातारा | दि.११ मार्च२०२६ (जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा):-
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सातारा शहरात उभारला जाणारा पूर्णाकृती पुतळा कलात्मकदृष्ट्या (सौंदर्य, रचना व आकर्षकता) अत्यंत चुकीचा असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा पुतळा तातडीने रद्द करून महाराष्ट्रातील एखाद्या ख्यातनाम शिल्पकाराकडून तो नव्याने उभारण्यात यावा, या मागणीचे निवेदन सकल मातंग समाज व समस्त आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने सातारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना देण्यात आले.
अंतिम पाहणी दौऱ्याची मागणी
या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून दलित, शोषित आणि कष्टकरी जनतेचे दुःख जगासमोर मांडले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांच्या शाहिरीने क्रांती घडवली. अशा महान महापुरुषाचा सातारा शहरात उभारला जाणारा पुतळा त्यांच्या ऐतिहासिक कार्याला साजेसा, देखणा आणि प्रभावी असणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या तयार करण्यात आलेला पुतळा कलात्मक निकषांवर उतरत नसल्याने समाजात तीव्र नाराजी आहे.
तीनदा पाहणी करूनही सुधारणा शून्य
सदर पुतळ्याचे काम मुंबईतील एका संस्थेला देण्यात आले आहे. दीड वर्षापूर्वीच हे काम पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. नगरपरिषदेच्या पुतळा समितीने आतापर्यंत तीन वेळा प्रत्यक्ष पाहणी केली. पहिल्याच पाहणीत काही सदस्यांनी त्रुटी दाखवून दिल्या होत्या. शिल्पकाराने सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात कोणताही बदल झालेला नाही, असा आरोप निवेदकर्त्यांनी केला आहे.
नुकतीच नगराध्यक्ष अमोल मोहिते, मुख्याधिकारी अभिजीत बापट व अन्य लोकप्रतिनिधींनी पुतळ्याची पाहणी केली असता, तिथेही पुतळ्याच्या अचूकतेबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली.
समाजाच्या भावना तीव्र
पुतळा समितीने लवकरात लवकर नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि समाजकल्याण सभापती यांच्या उपस्थितीत अंतिम पाहणी दौरा आयोजित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जर पुतळा कलात्मकदृष्ट्या समाधानकारक नसेल, तर तो नाकारून नामांकित शिल्पकाराकडून नवीन पुतळा तयार करावा, जेणेकरून सातारकरांना अण्णाभाऊंचे भव्य आणि वास्तववादी स्मारक पाहता येईल. यावेळी गणेश भिसे , सचिन कांबळे , विजय बडेकर , अझर मणेर, ऋतुराज चांदणे , नागेश सातपुते , सिद्धार्थ वायदंडे , अमित बडेकर , अनिल वायदंडे उपस्थित होते, यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!