single-post

सातारा जि. प. शिक्षण विभागाचा 'अजब' कारभार; अधिकारी खुर्चीत, जनता दालनाबाहेर ताटकळत!

​माजी सभापतींनाही ताटकळत ठेवल्याने संताप; 'मिटिंग' आणि 'सुनावणी'च्या नावाखाली सर्वसामान्यांची क्रूर थट्टा

11 March, 2026

सातारा जि. प. शिक्षण विभागाचा 'अजब' कारभार; ते खुर्चीत, जनता दालनाबाहेर ताटकळत!

​माजी सभापतींनाही ताटकळत ठेवल्याने संताप; 'मिटिंग' आणि 'सुनावणी'च्या नावाखाली सर्वसामान्यांची क्रूर थट्टा

सातारा | दि.११ मार्च २०२६(जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा):-

सातारा जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग सध्या आपल्या ढिसाळ आणि संथ कारभारामुळे जनतेच्या तीव्र रोषाचा केंद्रस्थानी आला आहे. या विभागाची इमारत सुसज्ज आणि प्रशस्त असतानाही, कामानिमित्त येणाऱ्या शिक्षक, कर्मचारी आणि नागरिकांना दालनात बसण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी, वृद्ध नागरिक आणि महिलांना चक्क दालनाबाहेर तासन्तास उभे राहावे लागत आहे. या अनागोंदी कारभारावरून "शिक्षण विभागातील अधिकारी जनतेच्या सेवेसाठी आहेत की त्यांना छळण्यासाठी?" असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

​लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांनाही दालनाबाहेरचा रस्ता

​शिक्षण विभागातील अधिकार्‍यांच्या या कार्यपद्धतीचा फटका केवळ सर्वसामान्यांनाच नाही, तर लोकप्रतिनिधींनाही बसत आहे. बावड्याचे माजी सभापती मनोज पवार आणि विद्यमान मंत्री मकरंद  पाटील यांचे कार्यकर्ते महत्त्वाच्या प्रशासकीय कामासाठी कार्यालयात आले असता, त्यांनाही दालनात प्रवेश न मिळाल्याने बाहेरच उभे राहावे लागले. काही वेळाने प्रतीक्षा करून त्यांना साहेबांची भेट मिळाली . जर माजी सभापतींच्या माणसांना दालनाबाहेर ताटकळत राहावे लागत असेल, तर सामान्य प्राथमिक शिक्षकाची या विभागात काय किंमत उरली आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

​'मिटिंग' आणि 'सुनावणी'चे तेच जुने बहाणे

​शिक्षण विभागातील अधिकारी हे प्रत्यक्ष कामापेक्षा बहाणे सांगण्यात अधिक 'तरबेज' असल्याचे चित्र आहे. सकाळी १० वाजल्यापासून लोक फाईली घेऊन दालनाबाहेर उभे असतात, मात्र आतून निरोप येतो की, "साहेब मिटिंगमध्ये आहेत" किंवा "सुनावणी सुरू आहे". दालनात बसण्याची पुरेशी जागा आणि इमारत चांगली असतानाही, नागरिकांना जाणीवपूर्वक बाहेर उभे केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. "अशी कोणती महत्त्वपूर्ण मीटिंग किंवा सुनावणी सुरू आहे, ज्यासाठी जनतेला तासन्तास ताटकळत ठेवले जाते?" अशी चर्चा दालनाबाहेर उभे असलेले नागरिक करत होते.

​'कासवगती' कारभाराला 'गतिमान' ब्रेक कधी?

​एकडे सरकार गतिमान प्रशासनाच्या गप्पा मारत असताना, साताऱ्याचा शिक्षण विभाग मात्र मनमानी पद्धतीने कारभार चालला आहे. या विभागाचा कारभार सुधारण्यासाठी नागरिकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून खालील मागण्या केल्या आहेत:

  • निश्चित भेटीची वेळ: अधिकाऱ्यांनी जनतेला भेटण्यासाठी आणि सुनावणीसाठी विशिष्ट वेळ पाळावी.
  • बैठक व्यवस्था: सुसज्ज इमारत असताना नागरिकांसाठी दालनात किंवा परिसरात बसण्याची तात्काळ सोय करावी.
  • पारदर्शक प्रशासन: फाईल नेमकी कुठे अडकली आहे, याचे उत्तर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी.

​मुख्य कार्यकारी अधिकारी चौकशी करणार का?

​शिक्षण विभागातील या सावळागोंधळाची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. या प्रकरणाची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) गांभीर्याने दखल घेऊन, संबंधित अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी आणि जनतेला सन्मानाची वागणूक मिळेल याची खात्री करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा, आगामी काळात जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांनी दिला आहे.

"प्रशस्त इमारत असूनही नागरिकांना उभे ठेवणे ही प्रशासकीय असंवेदनशीलता आहे. मिटिंगच्या नावाखाली जनतेला टाळणाऱ्या आणि सुनावणीचा बनाव रचणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रशासनाने जाब विचारणे गरजेचे आहे."

सातारा जिल्ह्यातील संतप्त नागरिक व सामाजिक कार्यकर्ते.