प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वैशाली बोतालजीची जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिकपदी निवड
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत आणि भावाच्या भक्कम आधाराने वैशालीचे यश; कोरेगावातील मातंग समाजाच्या वतीने सत्कार
09 August, 2026
जरंडेश्वर समाचार
कोरेगाव दि.९ ऑगस्ट जरंडेश्वर समाचार जनसेवा : कोरेगाव येथील मातंग समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातील कु. वैशाली बबन बोतालजी हिची सातारा जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिक (क्लार्क) पदावर निवड झाली आहे. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती, अनेक अडचणी आणि मर्यादित साधनसामग्रीवर मात करत वैशालीने मिळविलेले हे यश तिच्या कुटुंबीयांसह कोरेगाव शहरातील मातंग समाजासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल समाजबांधव, नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वैशाली बोतालजी हिचे आई-वडील अत्यंत कष्टकरी असून उदरनिर्वाहासाठी झाडू बनविण्याचा व्यवसाय करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता पडू दिली नाही. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मुलांनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे, अशी त्यांची कायम भूमिका राहिली. आई-वडिलांच्या कष्टाला आणि त्यागाला वैशालीने आपल्या मेहनतीने यशाची जोड दिली आहे.
वैशालीच्या शिक्षणाच्या प्रवासात तिचा भाऊ अभिजीत बोतालजी याची भूमिका विशेष महत्त्वाची ठरली. अभिजीत स्वतः कपड्यांच्या दुकानाचा व्यवसाय करतो. बहिणीच्या शिक्षणासाठी आवश्यक असणारी आर्थिक मदत त्याने वेळोवेळी केली. परीक्षा शुल्क असो, शिक्षणासाठी लागणारा खर्च असो किंवा अन्य अडचणी; वैशालीला गरज भासेल तेव्हा अभिजीत खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा राहिला. बहिणीने शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहावे, यासाठी त्याने सातत्याने प्रयत्न केले.
“यशाच्या वाटेवर एखाद्याने पाठीवर थाप मारून ‘तू पुढे जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत’ असे सांगणे आवश्यक असते. वैशालीच्या आयुष्यात हा आधार देणारा भाऊ अभिजीत ठरला,” अशी भावना तिच्या कुटुंबीय व समाजबांधवांकडून व्यक्त होत आहे.
आई-वडिलांचे कष्ट, भावाचा भक्कम आधार आणि वैशालीची जिद्द, मेहनत व सातत्य या तिन्हींच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. परिस्थितीने कितीही अडचणी निर्माण केल्या तरी शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाण्याची जिद्द असेल, तर यश मिळविता येते, हे वैशालीच्या यशातून अधोरेखित झाले आहे.
वैशालीच्या यशामुळे तिच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमानाचे भाव आहेत. आपल्या मुलांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करावी, हे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते. बोतालजी कुटुंबातील दोन्ही मुलांनी आपापल्या क्षेत्रात प्रगती केल्याने कुटुंबीयांना मोठा आनंद झाला आहे. वैशालीच्या यशाने नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार आणि समाजबांधवांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, वैशाली बबन बोतालजी हिची सातारा जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिकपदी निवड झाल्याबद्दल कोरेगाव शहरातील मातंग समाजबांधवांच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी तिच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन मिळविलेले वैशालीचे यश हे समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
गरीब आणि कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी परिस्थितीसमोर हार न मानता शिक्षणाची कास धरावी, जिद्द आणि सातत्य ठेवावे, असे आवाहनही समाजबांधवांनी केले. वैशालीने मिळविलेले यश हे केवळ तिच्या कुटुंबाचे यश नसून कष्टकरी पालक, भावंडांचा आधार आणि शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती करू इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी उदाहरण असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
वैशाली बोतालजी हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, “यशाची ही वाटचाल अशीच सुरू राहो आणि भविष्यात आणखी मोठे यश संपादन करावे,” अशा शुभेच्छा कोरेगाव शहरातील मातंग समाजबांधव, नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांनी दिल्या आहेत.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय