राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ; जानेवारीपासून ६० टक्के दर लागू
महागाई भत्ता ५८ वरून ६० टक्के; जानेवारीपासून वाढ लागू जानेवारी ते जुलैची सात महिन्यांची थकबाकी ऑगस्टच्या वेतनासोबत मिळणार राज्य शासकीय कर्मचारी, पात्र कर्मचारी तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना निर्णयाचा लाभ
18 August, 2026
राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ; जानेवारीपासून ६० टक्के दर लागू
मुंबई : राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ७व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनरचनेतील मूल वेतनावर देण्यात येणारा महागाई भत्ता (DA) ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्याचा शासन निर्णय वित्त विभागाने जारी केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी हा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार महागाई भत्त्यातील ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्यात आली आहे.
सात महिन्यांची थकबाकी मिळणार
जानेवारी २०२६ ते जुलै २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीतील वाढीव महागाई भत्त्याची थकबाकीही कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. ही थकबाकी तसेच वाढीव महागाई भत्ता ऑगस्ट २०२६ च्या वेतनासोबत रोखीने देण्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद, अनुदानित संस्थांनाही लागू
या निर्णयाचा संबंधित शासकीय कर्मचारी, तसेच पात्र कर्मचारी यांना लाभ मिळणार आहे. अनुदानप्राप्त संस्था आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही संबंधित सहाय्यक अनुदानाच्या लेखाशीर्षाखाली या खर्चाची तरतूद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महागाई भत्त्याची रक्कम देण्याबाबत अस्तित्वात असलेल्या तरतुदी व कार्यपद्धती यापुढेही कायम राहणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
वित्त विभागाचा शासन निर्णय क्रमांक : मभवा-1326/प्र.क्र.16/सेवा-9
दिनांक : १८ ऑगस्ट २०२६
या निर्णयाची प्रत महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून शासन निर्णयाचा संकेतांक 202608181803484905 असा आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय