single-post

महागाईने सर्वसामान्य जनता होरपळली; गॅस व कडधान्य दरवाढीने घरगुती बजेट कोलमडले

साताऱ्यात गॅस सिलेंडरची टंचाई; नागरिकांच्या लांबच लांब रांगा, शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी

12 March, 2026

सातारा दि.११ मार्च २०२६(जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा) :

सतत वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती आणि कडधान्यांच्या दरवाढीमुळे घरगुती अर्थसंकल्प अक्षरशः कोलमडून पडला आहे. रोजच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असल्याने गोरगरीब व मध्यमवर्गीय कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे चित्र सातारा जिल्ह्यात दिसून येत आहे.

गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्यामुळे अनेक कुटुंबांचे मासिक बजेट बिघडले आहे. त्यातच कडधान्ये, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले आहे. “महागाईमुळे जगणेच अवघड झाले आहे. आमची चूक झाली की अशा सरकारला निवडून दिले,” अशी भावना अनेक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, वाढत्या गॅस दरांचा परिणाम लहान हॉटेल व्यवसायावरही दिसून येत आहे. काही हॉटेल व्यावसायिकांनी गॅसच्या वाढत्या खर्चामुळे व्यवसाय चालवणे कठीण झाल्याची खंत व्यक्त केली आहे. काही ठिकाणी गॅसचा खर्च परवडत नसल्याने सरपणाच्या भट्ट्यांवर स्वयंपाक करून हॉटेल व्यवसाय सुरू ठेवावा लागतो की काय, अशीही चर्चा व्यावसायिकांमध्ये सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत असून सिलेंडर मिळविण्यासाठी नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी बुकिंग क्रमांकही बंद झाल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात येत आहे. तसेच काही खाजगी बुकिंग क्रमांक बंद करण्यात आल्याने ग्राहकवर्ग अधिकच नाराज झाला आहे.

एका ग्राहकाने साप्ताहिक जरंडेश्वर समाचारशी बोलताना सांगितले की, “युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. शासनाने तातडीने यावर उपाययोजना करून गॅस पुरवठा सुरळीत करावा.”

तसेच गॅस, पेट्रोल किंवा डिझेलचा कोणी कृत्रिम साठा करत असेल तर त्यावर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठोस निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.