single-post

दुधामध्ये भेसळ करतानाआरोपीवर गुन्हा दाखल;दोन लाख रुपयांचा मोठा साठा जप्त

सोलापूर अन्न आणि औषध प्रशासनानाची मोठी कारवाई; सातारा जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने अशी कारवाई करण्याची जनतेची अपेक्षा!

22 February, 2025

पंढरपूर : दुधामध्ये  भेसळ करत असताना तालुक्यातील सुगाव, भोसे येथे अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकला.  दूध भेसळीसाठी लागणारे पामतेल, केमिकल तसेच वापरण्यात येणारे सुमारे दोन लाख रुपयांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी दत्तात्रय महादेव जाधव, सचिन फाळके, अनिकेत कोरके या तिघांवर करकंब पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.गुन्हेगार फरार असून लवकरच अटक करण्यात येणार आहे.

 देशात बंदी असलेले आणि शरीराला अत्यंत अपायकारक असलेले मेलामाईन हे दूध भेसळीसाठी वापरले जाते. या केमिकलशी साधर्म्य असलेले एक पांढरे केमिकल द्रव, अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना पंढरपूर तालुक्यात सापडल्यामुळे दूध केंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली असून जनते मध्ये चर्चेला उधाण आले आहे.

मिळालेली  माहिती अशी की, शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सोलापूर येथील अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आणि करकंब पोलिस ठाण्याच्या पथकाने सुगाव भोसे येथे सापळा रचून खंबीर मार्फत एका घरावर छापा टाकला. यावेळी घटनास्थळी 13 लिटर दूध, (किंमत रु. 390), स्किम्ड मिल्क पावडर (अपमिश्रक) 28 पोती (699 किलो, किंमत रुपये 61 हजार 512), व्हेपरमिट पावडर (अपमिश्रक) (62 किलो, किंमत रुपये 5,368), रिफाईण्ड पामोलिन तेल (अपमिश्रक) (124.1 किलो, किंमत रुपये 23,506), अज्ञात पांढरे केमिकल द्रव (अपमिश्रक) (23 लिटर, किंमत रुपये 4,600), होल मिल्क पावडर (560.5 किलो, किंमत रुपये 98,648) असा एकत्रित एक लाख 94 हजार 24 रुपये किंमतीचा दूध भेसळीसाठी लागणारा कच्चा माल जवळ बाळगून दुधात भेसळ करताना आढळून आलेले आहे. संगनमताने मानवी शरीरास हानिकारक असलेल्या कृत्रिम दुध या अन्न पदार्थाचे उत्पादन करून पेढीमार्फत विक्री, वितरण करण्याचे उद्देशाने ठेवलेला आढळून आला आहे.

दरम्यान, पोलिस व अन्न आणि औषध प्रशासनाचा छापा पडल्याची माहिती कळताच दत्तात्रय जाधव हा फरार,पसार झाला असून याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी करकंब पोलीस ठाण्यात आरोपी दत्तात्रय महादेव जाधव, सचिन अरुण फाळके, अनिकेत बबन कोरके (सर्व रा. सुगाव भोसे) यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदाकलम अन्वये करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई करताना सोलापूर येथील अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी सुनील जिंतूर, मंगेश लवटे, करकंब पोलीस ठाण्याचे सपोनी सागर कुंजीर यांनी सहभाग घेतला यांच्या कारवाई मुळे पुढील अनर्थ टळला असला तरी पुढील काळात अशा घटनांपासून लोकांनी सावध रहावे असे आव्हान अन्न औषध प्रशासन यांनी केले आहे.भेसळ करताना पकडायची ही चौथी वेळ आहे आरोपी दत्तात्रय जाधव हा खूप वर्षांपासून दुधात भेसळ करत आहे आहे. भेसळ करताना पकडण्याची त्याची ही चौथी वेळ आहे. विशेष म्हणजे यापूर्वी चार वेळा भेसळ करताना पकडूनही जाधव हा एका केसमधून निर्दोष सुटला आहे. दोन प्रकरणांत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याबाबत (कै.) आ. भारत भालके यांनी सुगाव येथे होणार्‍या दूध भेसळीबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी भारतात बंदी असलेले मेलामाईंन हे केमिकल मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. एवढे सारे होऊनसुद्धा भोसे परिसरात दूध भेसळीचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरूच होते.मुखयमंत्री, दुग्धविकास मंत्री यांनी याबाबत कठोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी जनतेतून होत आहे तसेच. सोलापूर अन्न आणि औषध प्रशासनानाची मोठी कारवाई , सातारा जिल्ह्यात  दुध डेअरीची  तपासणी करावी ,  सातारा जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने अशी कारवाई करण्याची जनतेची अपेक्षा!!