आरोग्य सुविधा गावागावात पोहोचविण्यासाठी सरकार कटिबद्ध : आमदार महेश शिंदे
कोरेगावमध्ये आयुष्मान भारत दवाखान्याचे उद्घाटन; मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व ट्रॉमा सेंटरचा प्रस्ताव राज्य सरकारकडे
18 July, 2026
जरंडेश्वर समाचार
कोरेगाव | प्रतिनिधी
ग्रामीण भागातील सर्वसामान्य व गरजू नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, गावागावात आयुष्मान भारत आरोग्य मंदिर (दवाखाने) सुरू करण्यावर विशेष भर दिला जात आहे, असे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले.
कोरेगाव शहरात जिल्हा परिषदेमार्फत सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान भारत दवाखान्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, नगरपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना किरकोळ आजारांपासून ते प्राथमिक उपचारांपर्यंत सर्व सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, हा शासनाचा उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि मोठ्या शहरांमध्ये जाण्याचा त्रास कमी होणार आहे. कोरेगावच्या नागरिकांना अधिक सक्षम व आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे.
मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व ट्रॉमा सेंटरचा प्रस्ताव
कोरेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयालगत उपलब्ध जागेवर अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व ट्रॉमा सेंटर उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असून, त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली.
या रुग्णालयात विविध तज्ज्ञ डॉक्टर, शल्यचिकित्सक, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, आपत्कालीन उपचार व्यवस्था तसेच २४ तास सेवा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. अपघातग्रस्त रुग्णांना 'गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्राथमिक आरोग्य सेवांवर भर
जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. आयुष्मान भारत दवाखान्यांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत प्राथमिक आरोग्य सेवा, तपासणी, औषधोपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण होणार
कोरेगाव नगरपंचायत हद्दीतील जुनी पेठ–सुभाषनगर मार्गावरील पुलाजवळ पडलेल्या खड्ड्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार महेश शिंदे म्हणाले की, संबंधित रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू असून उर्वरित कामही लवकरच पूर्ण करण्यात येईल. विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध असून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची काळजी घेण्यात येत आहे.
पुलाजवळील धोकादायक खड्डा तातडीने बुजविण्याच्या सूचना नगरपंचायतीला देण्यात आल्या असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नगरसेवक नितीन ओसवाल यांची संकल्पना
या आयुष्मान भारत दवाखान्याच्या उभारणीत नगरसेवक नितीन ओसवाल यांनी पुढाकार घेतला. कोरेगाव शहरातील नागरिकांना त्यांच्या परिसरात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने हा दवाखाना सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
"हा दवाखाना सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा," असे आवाहनही नितीन ओसवाल यांनी केले.
उद्घाटनास मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुनील खत्री, जयवंत पवार, काशीद पवार, अजित बंगें, नगराध्यक्ष दीपालीताई बर्गें, उपनगराध्यक्ष राहुल बर्गे ,महेश बंगें, नियोजन समिती सदस्य राहुल बंगें, नगरसेवक सचिन बंगें, सुनील बंगें, तसेच सर्व नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, नगरपंचायत कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय