सातारा जिल्ह्यात जागतिक स्तनपान सप्ताह उत्साहात संपन्न
शाश्वत जीवनाच्या सुरुवातीसाठी स्तनपान : जे प्रभावी आहे ते अधिक बळकट करा’ या घोषवाक्याला प्रभावी प्रतिसाद
09 August, 2026
सातारा जिल्ह्यात जागतिक स्तनपान सप्ताह उत्साहात संपन्न
‘शाश्वत जीवनाच्या सुरुवातीसाठी स्तनपान : जे प्रभावी आहे ते अधिक बळकट करा’ या घोषवाक्याला प्रभावी प्रतिसाद
आरोग्य संस्थांमध्ये जनजागृती, मातांचे समुपदेशन; नवजात बालकांच्या आरोग्यासाठी स्तनपानाचे महत्त्व पटवून दिले
सातारा : नवजात बालकांच्या सुदृढ आरोग्याचा पाया मजबूत करण्याबरोबरच मातांमध्ये स्तनपानाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने १ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सातारा जिल्ह्यात जागतिक स्तनपान सप्ताह विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या सप्ताहासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या ‘शाश्वत जीवनाच्या सुरुवातीसाठी स्तनपान : जे प्रभावी आहे ते अधिक बळकट करा’ या घोषवाक्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात आली.
बालकाच्या जन्मानंतर पहिल्या एका तासात स्तनपान सुरू करणे आणि जन्मापासून पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध देणे याचे महत्त्व मातांना समजावून सांगण्यात आले. नवजात बालकाच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी आईचे दूध अत्यंत महत्त्वाचे असून, बालकाला आयुष्याच्या सुरुवातीलाच योग्य पोषण मिळणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये जनजागृती
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, ८४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच गावागावात आयोजित करण्यात येणाऱ्या नियमित लसीकरण सत्रांच्या माध्यमातून स्तनपानाबाबत जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत मातांना स्तनपानाचे आरोग्यदायी फायदे, योग्य पद्धतीने स्तनपान कसे करावे, नवजात बालकाच्या सर्वांगीण वाढीसाठी आईच्या दुधाचे महत्त्व तसेच बालकाच्या पोषणाची योग्य काळजी याबाबत समुपदेशन करण्यात आले.
बालकांच्या उत्तम वाढीसाठी आवश्यकतेनुसार जीवनसत्त्व ‘अ’च्या मात्रांचेही वितरण करण्यात आले. त्यामुळे स्तनपानासोबतच बालकांच्या पोषण आणि आरोग्यविषयक गरजांकडेही आरोग्य विभागाने विशेष लक्ष दिले.
आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविकांचा सक्रिय सहभाग
जागतिक स्तनपान सप्ताह यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि परिचारिका यांनी सक्रिय सहभाग घेतला.
सप्ताहाच्या कालावधीत जनजागृतीपर उपक्रम, मातांचे समुपदेशन, प्रबोधनपर व्याख्याने तसेच मातांसोबत संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले. स्तनपानाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याबरोबरच मातांना योग्य माहिती देण्यावर विशेष भर देण्यात आला.
या विविध उपक्रमांमुळे जिल्ह्यात स्तनपानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली. नवजात बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्तनपानाचे महत्त्व अधिक प्रभावीपणे मातांपर्यंत पोहोचविण्यात आरोग्य विभागाला यश आले.
जिल्ह्यात व्यापक नियोजन
सातारा जिल्ह्यातील जागतिक स्तनपान सप्ताहाचे नियोजन डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सातारा, डॉ. राहुल जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय सातारा तसेच डॉ. अभिराज सूर्यवंशी, माता-बाल संगोपन अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
त्यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करत सप्ताहाची प्रभावी अंमलबजावणी केली.
‘स्तनपानाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे’ – राजू भोसले
जिल्हा परिषद सातारा उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती राजुभैय्या भोसले यांनी स्तनपानाच्या महत्त्वावर भाष्य करताना सांगितले की, निरोगी आणि सक्षम पिढी घडविण्याची सुरुवात आईच्या स्तनपानातून होते. बालकाला जन्मानंतर पहिल्या एका तासात स्तनपान सुरू करणे आणि पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध देणे ही प्रत्येक कुटुंबाची सामूहिक जबाबदारी आहे.
जागतिक स्तनपान सप्ताहाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात मातांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आरोग्य विभागाने प्रभावी उपक्रम राबविले आहेत. प्रत्येक नवजात बालकाला जीवनाची सुदृढ आणि सुरक्षित सुरुवात मिळावी, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने स्तनपानाला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
सातारा जिल्हा परिषद आरोग्यदायी माता आणि सशक्त बालक घडविण्यासाठी अशा जनजागृती उपक्रमांना सातत्याने प्राधान्य देत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘माता व बाल आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य’ – डॉ. प्रिया शिंदे
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी सांगितले की, सुदृढ, निरोगी आणि सक्षम समाजाची पायाभरणी मातांच्या आरोग्यापासून आणि बालकांच्या योग्य संगोपनापासून सुरू होते. आईचे दूध हे नवजात बालकासाठी निसर्गाने दिलेले सर्वोत्तम पोषण आहे.
जन्मानंतरच्या पहिल्या एका तासात स्तनपान सुरू करणे आणि पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध देणे ही प्रत्येक बालकाला जीवनाची सर्वोत्तम सुरुवात देणारी अमूल्य गुंतवणूक आहे. जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने आरोग्य विभाग, अंगणवाडी यंत्रणा आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी राबविलेल्या जनजागृती उपक्रमांमुळे मातांमध्ये स्तनपानाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण होत आहे.
प्रत्येक माता, कुटुंब आणि समाजाने स्तनपानाला प्रोत्साहन दिल्यास कुपोषणमुक्त, निरोगी आणि सक्षम सातारा घडविण्याचे ध्येय अधिक बळकट होईल. जिल्हा परिषद माता व बाल आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत अशा लोककल्याणकारी उपक्रमांना सातत्याने पाठबळ देत राहील, असे डॉ. प्रिया शिंदे यांनी सांगितले.
निरोगी बालकासाठी स्तनपान महत्त्वाचे
नवजात बालकाच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात योग्य पोषण मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्तनपानाबाबत योग्य माहिती प्रत्येक मातेला मिळणे आणि कुटुंबातील सदस्यांनी त्यासाठी मातेला आवश्यक सहकार्य करणे गरजेचे आहे.
सातारा जिल्ह्यात जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने आरोग्य विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे स्तनपान, माता-बाल आरोग्य आणि बालकांच्या पोषणाबाबत जनजागृती वाढण्यास मोठी मदत झाली आहे. स्तनपान हे बालकाच्या निरोगी, सक्षम आणि आरोग्यदायी भविष्याचा मजबूत पाया असल्याने प्रत्येक माता आणि कुटुंबाने त्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय