single-post

अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली विकासकामांना मंजुरीचा 'स्पीड'; कामे दर्जेदारच व्हावीत : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

​अजिंक्यतारा संवर्धनासाठी १३४.८० कोटी, तर संगम माहुलीसाठी १३२.९५ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता ​जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत आढावा; दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

27 July, 2026


​जरंडेश्वर समाचार वृत्तजनसेवा:

सातारा :

ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन, संवर्धन व परिसर सुशोभीकरणासाठी तब्बल १३४.८० कोटी रुपये आणि संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, महाराणी येसुबाई व छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांच्या जीर्णोद्धारासह परिसर विकासासाठी १३२.९५ कोटी रुपयांच्या कामांना अखेर प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ही दोन्ही कामे अत्यंत वेगाने व दर्जेदार करा; कामाच्या दर्जाबाबत कसलीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

​जिल्हाधिकारी कार्यालयात ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली या दोन्ही महत्त्वपूर्ण विकासकामांचा आढावा घेणारी उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक अविनाश कदम, अक्षय जाधव, फिरोज पठाण, सचिन कांबळे, कन्हैयालाल राजपुरोहित, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विश्वास सातपुते, पुरातत्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहने, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, श्रीराम कुलकर्णी आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इंद्रजित नागेशकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

​दोन्ही कामांची एकत्रित निविदा काढा

बैठकीत सूचना देताना ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली येथील कामांची निविदा प्रक्रिया एकत्रितपणे राबवण्यात यावी. किल्ल्यावर विविध पायवाटा तयार केल्या जाणार आहेत. मात्र रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांचा वावर लक्षात घेता, प्रकाश दिव्यांचा लोट केवळ पायवाटांवरच पडेल, अशा विशिष्ट पद्धतीचे दिवे बसवले जावेत. तसेच संवर्धनाचा निधी शिल्लक राहिल्यास खिंडीतील गणपती मंदिरापासून किल्ल्यावर जाण्यासाठी नवी पायवाट तयार करावी. यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष किल्ल्याची पाहणी करून आराखडा निश्चित करावा.

​संगम माहुलीचा रस्ता काँक्रीटचा होणार; प्रवेशद्वारावर आकर्षक कमान

संगम माहुली येथील कामांचा आढावा घेताना ते पुढे म्हणाले, प्रवेशद्वारापासून गावापर्यंतचा रस्ता रुंद करून तो पूर्णपणे काँक्रीटचा करण्यात यावा. यासाठी स्थानिक ग्रामस्थांशी सकारात्मक चर्चा करून त्यांना विश्वासात घ्यावे. गावात सुसज्ज पार्किंग व्यवस्था उभारावी आणि सर्व उघडी गटारे बंदिस्त करावीत. तसेच मुख्य प्रवेशद्वारावरील कमान आकर्षक व नव्या डिझाइननुसार पुनरुज्जीवित करावी.

​सातारकरांच्या स्मरणात राहील असे काम व्हावे!

"अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली ही सातारची ऐतिहासिक अस्मिता आहे. त्यामुळे ही विकासकामे सातारकरांच्या सदैव स्मरणात राहतील अशा अत्यंत उत्कृष्ट दर्जाची आणि नयनरम्य झाली पाहिजेत," असा विश्वास व्यक्त करत त्यांनी अधिकाऱ्यांना कामाला गती देण्याचे आदेश दिले.