single-post

कोरेगाव भिवडीजवळ सोलापूर–मेढा एसटी बस पलटी; अनेक प्रवासी जखमी, मोठी जीवितहानी टळली

जखमी असूनही वाहक राहुल माळवे यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेला दिले प्राधान्य; स्वतः अद्याप उपचारासाठी गेले नाहीत

23 July, 2026

कोरेगाव भिवडीजवळ सोलापूर–मेढा एसटी बस पलटी; अनेक प्रवासी जखमी, मोठी जीवितहानी टळली

जखमी असूनही वाहक राहुल माळवे यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेला दिले प्राधान्य; स्वतः अद्याप उपचारासाठी गेले नाहीत

कोरेगाव- जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:

कोरेगाव–सातारा मार्गावरील भिवडी गावाच्या अलीकडे गुरुवारी दुपारी सुमारे १२.१४ वाजण्याच्या सुमारास सोलापूर–मेढा आगाराची एसटी बस अपघातग्रस्त झाली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या डाव्या बाजूला घसरून खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून काहींना किरकोळ मुकामार लागला आहे. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली.

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना बसमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जखमींना उपचारासाठी कोरेगाव व सातारा येथील रुग्णालयात हलविण्यात आले, तर इतर प्रवाशांची पर्यायी एसटी बसद्वारे पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात आली.

या अपघातात एसटीचे वाहक राहुल माळवे यांच्या हाताला व पायाला दुखापत झाली. मात्र स्वतः जखमी असूनही त्यांनी उपचारासाठी जाण्याऐवजी सर्वप्रथम प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली. प्रत्येक प्रवाशाला सुरक्षितपणे दुसऱ्या बसमध्ये बसवून पुढील प्रवासासाठी रवाना केल्यानंतरही ते घटनास्थळीच थांबून मदतकार्य करत होते. वृत्त लिहिपर्यंत त्यांनी स्वतः उपचारासाठी गेल्याची माहिती नव्हती. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे व सेवाभावाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही एसटी गाडी सोलापूर वरून कदाचित ड्रायव्हरला झोप लागली असावी असाही अंदाज बांधता जात आहे.अपघाताच्या वेळी पावसामुळे रस्ता ओला होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या चिखल व मऊ मातीमुळे बस खड्ड्यात पलटी झाली असली तरी अपघाताची तीव्रता कमी राहिली. त्यामुळे गंभीर जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे.

अपघातामुळे काही प्रवासी भयभीत झाले होते. स्थानिक नागरिकांनी त्यांना धीर देत मदतकार्य केले. एसटी प्रशासनाचे अधिकारी व वरिष्ठ कर्मचारी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेत होते.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली असून चालक, वाहक, प्रवासी तसेच प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून माहिती संकलित केली जात आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस व एसटी प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.