मुसळधार पावसामुळे आळंदीतील पालखी प्रस्थान सोहळ्यावर निर्बंध; ८ जुलैचा सोहळा मर्यादित स्वरूपात होणार
इंद्रायणीने धोक्याची पातळी ओलांडली; वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचे संस्थान कमिटीचे आवाहन
06 July, 2026
आळंदी | प्रतिनिधी
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे श्रीक्षेत्र आळंदी येथे पूरस्थिती निर्माण झाली असून, इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने ८ जुलै रोजी होणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढीवारी पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित स्वरूपात आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने घेतला आहे. तसेच वारकरी भाविकांनी पालखी प्रस्थानासाठी आळंदीत न येता पुढील मुक्कामापासून सोहळ्यात सहभागी व्हावे, असे नम्र आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
संस्थान कमिटीने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आळंदी येथे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून नदीवरील पूल, वाहतूक व्यवस्था आणि मूलभूत सुविधा विस्कळीत झाल्या आहेत. इंद्रायणी पुलावरील कठडे आणि विद्युत खांब वाहून गेले असून, नगरपरिषदेचे वॉटरहाऊसही पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे अशक्य झाले आहे.
पालखी सोहळ्यासाठी उभारण्यात आलेली दर्शनबारी, अनेक मोबाईल शौचालये तसेच इतर तात्पुरत्या सुविधा पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून, तंबू व राहुट्यांच्या जागी मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याने वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करणेही शक्य नसल्याचे संस्थानने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात होणारा पालखी प्रस्थान सोहळा अत्यंत मर्यादित उपस्थितीत पार पाडण्यात येणार आहे. यामध्ये रथापुढील दिंडी क्रमांक १ ते २७ आणि रथामागील दिंडी क्रमांक १ ते २० (पोटभागासह एकूण ५६ दिंड्या) येथील प्रत्येकी १० वारकरी, दिंडीप्रमुख, मानकरी, सेवेकरी व प्रतिष्ठित व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय मानाचे खांदकरी, कर्मचारी, आरोग्य, स्वच्छता व पोलीस कर्मचारी अशा आवश्यक सेवांतील व्यक्तींच्या उपस्थितीतच सोहळा संपन्न होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
संस्थान कमिटीने सर्व वारकरी भाविकांना पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन पालखी प्रस्थानासाठी आळंदीत न येण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर पुढील मुक्कामापासून सोहळ्यात सहभागी होण्याबाबत स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध करण्यात येईल, असेही संस्थानने म्हटले आहे.
संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे आणि विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र बाबुराव उमाप यांनी वारकरी संप्रदायाने या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहन करत "रामकृष्ण हरी" या नामघोषासह भाविकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय