रानडुकरांच्या हल्ल्यात जखमी शेतकऱ्यास वनविभागाकडून तात्काळ नुकसानभरपाई
कोरेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाची तत्पर कार्यवाही; शेतकरी वर्गातून समाधान
06 July, 2026
रानडुकरांच्या हल्ल्यात जखमी जरंडेश्वर समाचार
कोरेगाव दि.६जून २०२६ : जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:-
कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथील शेतकरी दत्तात्रय खाशाबा पवार हे शेतात काम करत असताना रानडुकरांच्या हल्ल्यात जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच कोरेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाने तात्काळ दखल घेत शासनाच्या नियमांनुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण करून संबंधित शेतकऱ्यास नुकसानभरपाई मंजूर केली. वनविभागाच्या या तत्पर आणि संवेदनशील भूमिकेमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक वनसंरक्षक दिगंबर जाधव यांच्या सहकार्याने ही संपूर्ण प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यात आली.
घटनेनंतर जखमी दत्तात्रय पवार यांनी आवश्यक वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर वनविभागाकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज सादर केला. अर्जासोबत वैद्यकीय अहवाल, पंचनामा आणि अन्य आवश्यक कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यात आली. सर्व बाबींची खातरजमा झाल्यानंतर शासनाच्या प्रचलित नियमांनुसार नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली.
कोरेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे यांनी स्वतः जखमी शेतकरी दत्तात्रय पवार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच आवश्यक कागदपत्रांची छाननी करून प्रकरण तातडीने मार्गी लावत शासनाकडून मंजूर झालेली आर्थिक मदत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य जखमी झाल्यास किंवा इतर नुकसान झाल्यास संबंधितांनी कोणताही विलंब न करता वनविभागाशी संपर्क साधावा. घटनास्थळी पंचनामा करून आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर केल्यास शासनाच्या नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. यासाठी वनविभाग सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी बिचुकले गावचे सरपंच प्रशांत पवार, पत्रकार सुरेश बोतालजी तसेच लक्ष्मण चव्हाण उपस्थित होते. वनविभागाने तातडीने कार्यवाही करून जखमी शेतकऱ्यास दिलासा दिल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
ग्रामीण भागात रानडुकरांचा वावर वाढत असल्याने शेतकऱ्यांनी शेतात काम करताना आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही चंद्रहार जगदाळे यांनी केले.
दरम्यान, कोरेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाने शासनाच्या नियमांनुसार तातडीने कार्यवाही करून जखमी शेतकरी दत्तात्रय खाशाबा पवार यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिल्याने वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे बाधित नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल कोरेगाव तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय