single-post

सातारा जिल्ह्यात पावसाचे तांडव : आमदार-मंत्र्यांच्या केवळ 'पाहण्या' सुरू असताना 'कामेश कांबळे' ठरतोय गोरगरिबांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणारा खरा 'दाता'

​"आभाळ फाटलं तरी गरिबाचा आधार तुटला नाही; पावसाच्या तांडवात 'कामेशभाऊ' बनले गोरगरिबांचे छप्पर!"​"केवळ कागदी पाहणी नव्हे, तर स्पॉटवर प्रत्यक्ष कृती; साताऱ्यात उमटतेय कामेश कांबळेंच्या कामाची पोचपावती!"

04 July, 2026

​– सुरेश बोतालजी

(संपादक, साप्ताहिक जरंडेश्वर समाचार)

​सातारा :

सातारा जिल्ह्यात सध्या पावसाने अक्षरशः तांडव मांडले आहे. आभाळ फाटावे तसा पाऊस कोसळतोय. पण या पावसाच्या प्रत्येक थेंबासोबत सातारा शहर आणि जिल्ह्यातील शेकडो गरिबांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. श्रीमंतांच्या सिमेंटच्या जंगलात पावसाची मजा घेतली जात असताना, दुसरीकडे याच साताऱ्यातील दलितांच्या, गरिबांच्या आणि वंचितांच्या वस्त्यांमध्ये मात्र गरिबीचे उघडेवाघडे प्रदर्शन मांडले गेले आहे. छपरावरचे पत्रे गंजून सडलेत, प्लास्टिकची कव्हरे फाटलीत आणि मातीची भिंत कधी अंगावर येईल याचा नेम नाही, अशा नरकयातना भोगत साताऱ्यातील गरीब जनता आज जगत आहे.

​घरामध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. घरात असणारी वृद्ध माणसे, लहान मुले एका कोपऱ्यात पावसाच्या पाण्यात चिंब भिजत उभी आहेत. ज्या हातांनी म्हातारपणात काठी पकडायची, त्या हातांनी ही वृद्ध माणसे घरातील पाणी घंगाळाने बाहेर उपसत आहेत. डोळ्यातून वाहणारे पाणी आणि आभाळातून पडणारे पाणी एक झाले आहे! अशा भयावह आणि डोळ्यात पाणी आणणाऱ्या परिस्थितीत, एसी गाड्यांमधून फिरणारे नेते आणि निवडणुका आल्यावर हात जोडणारे राजकीय नेते कुठे आहेत? हा सातारकरांचा संतप्त सवाल आहे. पाहणी करायची, फोटो काढायचे आणि निघून जायचे... अशा ढोंगी नेत्यांची संख्या या देशात आणि जिल्ह्यात कमी नाही. मात्र, याच चिखलात, याच पाण्यात आणि याच गरिबांच्या झोपडीत स्वतः पाय रोवून उभा राहणारा एक सहृदयी तरुण साताऱ्याला पाहायला मिळाला, त्याचे नाव कामेशभाऊ कांबळे!

​फक्त आश्वासनांची खैरात नाही, थेट कामाची पोचपावती!

​नुकतेच जिल्हा परिषदेवर प्रचंड बहुमताने निवडून आलेले तरुण उद्योजक आणि लोकप्रतिनिधी कामेशभाऊ कांबळे यांनी सत्तेची ऊब न घेता थेट जनतेच्या दुःखाला कवेत घेतले आहे. पाऊस सुरू झाल्यापासून कामेशभाऊंनी आपला कोणताही प्रोटोकॉल न बाळगता थेट बाधीत घरांना भेटी देणे सुरू केले आहे. ते केवळ अधिकारी घेऊन पाहणी करत नाहीत, तर प्रत्येक गरिबाच्या घरात जाऊन तिथल्या माऊलीच्या डोक्यावर हात ठेवून आधार देत आहेत.

​"थोडे दिवस थांबा, हा पाऊस संपू दे, तुमचे हक्काचे घर मी बांधून देतो!"

​हा शब्द जेव्हा कामेशभाऊंच्या मुखातून निघतो, तेव्हा त्या निराश झालेल्या गरिबाच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतात. जिथे भलेभले नेते हात वर करतात, तिथे हा तरुण स्वतःच्या खिशातून, स्वतःच्या ताकदीने गळणाऱ्या छपरांवर नवीन पत्र्याचे शेड उभे करून देत आहे. एकदा मत घेतले की पाच वर्षे तोंड न दाखवणाऱ्या राजकारणी नेते या राज्यात कमी नाहीत !, सतत लोकांच्या अवतीभवती राहणारा असा लोकप्रतिनिधी मिळणे हे सातारकरांचे भाग्यच म्हणावे लागेल.

​फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा जिवंत वारसा

​आजच्या काळात कितीही प्रचंड पैसेवाला असला, मोठा उद्योजक असला, तरी एक रुपया खर्च करताना दहा वेळा विचार करतो. पण कामेशभाऊंचा पिंड वेगळा आहे. गरिबांचे दुःख स्वतःचे समजून धावून जाणाऱ्या या तरुणाकडे पाहिल्यावर 'महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांच्या सामाजिक न्याय आणि सेवाभावाच्या विचारांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

​त्यांचे कार्य केवळ पावसाळ्यापुरते मर्यादित नाही. समाजातील सांस्कृतिक धागा जपण्यासाठी भजनी मंडळांना तबला आणि वाद्यांचे वाटप असो, तरुणाईला योग्य दिशा देण्यासाठी क्रिकेट साहित्याचे वाटप असो, वा गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शालेय गणवेश आणि उपयोगी साहित्याचे वाटप असो... प्रत्येक ठिकाणी कामेश कांबळे नावाचा हा 'झांझावात' धावून जात आहे. सर्वसामान्यांची पाण्याची समस्या, रस्त्यांचे रखडलेले प्रश्न, आजारपणात गरिबांना न पेलवणारा दवाखान्याचा खर्च, पोलीस स्टेशन असो वा तहसील कार्यालयातून मिळणारे उत्पन्नाचे दाखले... गोरगरिबांचे कोणतेही काम असो, कामेशभाऊ तिथे हजर असतात.

​...तरच या राज्याचा उद्धार होईल!

​आजच्या राज्यकर्त्यांकडे आणि एकूणच राजकारणाकडे पाहिल्यानंतर जनतेच्या पदरी केवळ उद्वेग आणि दुःखच येत आहे. जनता महागाई, बेरोजगारी आणि निसर्गाच्या कोपाने होरपळत असताना सरकार मात्र सत्तेच्या खेळात मश्गूल आहे. अशा नैराश्याच्या अंधारात कामेश कांबळे यांच्यासारखा एक तरुण युवक साताऱ्यात आशेचा किरण बनून काम करत आहे, ही सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. लोक आज मनोमंन म्हणत आहेत की, "आम्ही एका सच्चा आणि प्रामाणिक तरुणाला जिल्हा परिषदेत पाठवले, त्याचेच हे फळ आज आम्हाला मिळत आहे."

​खरंतर, कामेशभाऊ कांबळे यांच्यासारखी संवेदनशील आणि तडफदार कार्यकर्त्यांची फौज आज संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण होण्याची गरज आहे. तरच या राज्यातील शेवटच्या घटकाचे अश्रू पुसले जातील.

​नुकताच कामेशभाऊ कांबळे यांचा वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्यांच्या या अलौकिक सामाजिक कार्याला 'जरंडेश्वर समाचार' परिवाराच्या वतीने मानाचा मुजरा आणि खूप खूप शुभेच्छा! त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच आई भवानी चरणी प्रार्थना!

​– सुरेश बोतालजी

(संपादक, साप्ताहिक जरंडेश्वर समाचार)