single-post

​सार्वजनिक बांधकाम विभागात मोठा फेरबदल; २७ कार्यकारी अभियंत्यांच्या घाऊक बदल्या, मंत्रालयाकडून आदेश जारी

सार्वजनिक बांधकाम विभागातील २७ कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्या.​

30 June, 2026

जरंडेश्वर समाचार 

मुंबई दि.३० जून ३०२६ |​जरंडेश्वर समाचार वृत्तजनसेवा : प्रशासकीय कार्यक्षमतेला गती देण्यासाठी आणि विविध विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गातील तब्बल २७ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नवीन पदस्थापनेचे आदेश मंगळवारी (दि. ३० जून) जारी केले. मंत्रालयातून आलेल्या या घाऊक बदल्यांच्या आदेशामुळे शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

​हा महत्त्वपूर्ण निर्णय ‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विलंबास प्रतिबंध आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५’ मधील कलम ४(४) व ४(५) च्या तरतुदींच्या अधीन राहून सक्षम प्राधिकाऱ्याच्या विशेष मंजुरीने घेण्यात आला आहे.

​विविध विभागांना स्पर्श; रिक्त जागा भरण्यावर भर

​प्राप्त झालेल्या शासन आदेशानुसार, या फेरबदलात राज्यातील पथ अभियांत्रिकी, ग्रामीण रस्ते विकास, राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच विविध विद्यापीठांमधील कार्यकारी अभियंता दर्जाच्या जागांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सेवानिवृत्ती आणि पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या जागांचा प्रामुख्याने विचार करून हा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे.

​प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नवीन पदस्थापना खालीलप्रमाणे:

​श्रीमती वीणा मारुती पुजारी: पत्तन अभियांत्रिकी विभाग, कुठाळ येथून महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था (MSRRDA), रत्नागिरी येथे बदली.

​श्रीमती शितल विवेक देशपांडे: दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, पुणे येथे पदस्थापना.

​श्री. उमेश बंडू झगडे: महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ (MSIDC), मुंबई येथे नियुक्ती.

​श्रीमती श्रद्धा अशोक शेळके: राष्ट्रीय महामार्ग विभाग, ठाणे येथे बदली.

​श्री. रोहित विश्वास तोदले: सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग, कोल्हापूर येथून मार्ग प्रकल्प विभाग, सांगली येथे बदली.

​श्री. दिपक नारायण टेकाळे: संकल्पचित्र विभाग (पूल व इमारती), नांदेड येथून सार्वजनिक बांधकाम विभाग, लातूर येथे बदली.

​श्री. अनिल प्रकाश जाधव: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित (MSRDC), मुंबई (शिविर कार्यालय, नागपूर) येथून सार्वजनिक बांधकाम विभाग, देगलूर (जि. नांदेड) येथे बदली.

​श्री. धनंजय चंद्रकांत जाधव: MSRDC, मुंबई (शिविर कार्यालय, छत्रपती संभाजीनगर) येथून सार्वजनिक बांधकाम विभाग, परभणी येथे बदली.

​श्री. सुरेश कांतराव जोशी: MSRDC, मुंबई (शिविर कार्यालय, छत्रपती संभाजीनगर) येथून सार्वजनिक बांधकाम विभाग, हिंगोली येथे बदली.

​श्री. श्रीधर भानुदास कांबळे: सहाय्यक मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावती येथून अमरावती महानगरपालिका, अमरावती येथे प्रतिनियुक्तीने बदली.

​श्री. श्रीकांत विजय ढगे: भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI), नवी दिल्ली येथून राष्ट्रीय महामार्ग विभाग, नागपूर येथे बदली.

​श्री. अविनाश राजारामजी मोरे: सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १, गडचिरोली येथून सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २, गडचिरोली येथे बदली.

​श्रीमती छायादेवी यशवंतराव कदम: मुंबई विद्यापीठ, मुंबई येथून इमारती घ. क्र. २, संकल्पचित्र मंडळ, नवी मुंबई येथे बदली.

​श्री. हेमंतकुमार रामचंद्र चौगुले: जिल्हा परिषद (सा. बां.) विभाग, पुणे (२) (उत्तर) येथून नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई (शिबिर कार्यालय, पुणे) येथे बदली.

​श्री. मोहसीन ईस्माईल मोदी: जिल्हा परिषद (सा. बां.) (उत्तर) विभाग, सातारा येथून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे बदली.

​श्री. संजय दत्तात्रय खोत: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथून जिल्हा परिषद (सा. बां.) (उत्तर) विभाग, सातारा येथे बदली.

​श्री. नितीन वामन बोरोले: कार्यकारी अभियंता तथा पदसिद्ध अवर सचिव (मुंबई रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई येथून सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग, नाशिक येथे बदली.

​श्री. सागर किशोर चौधरी: जिल्हा परिषद (सा. बां.) (दक्षिण) विभाग, अहिल्यानगर येथून महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था (MSRRDA), जळगाव येथे बदली.

​श्री. नितीन तानाजी बारहाते: विशेष प्रकल्प विभाग, सिरोचा (जि. गडचिरोली) येथून जिल्हा परिषद विभाग (सा. बां.), गडचिरोली येथे बदली.

​श्रीमती सुनिता सीएसआरएस चक्रवर्ती चिंतलपुढी: मार्ग प्रकल्प विभाग क्र. १, पुणे येथून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित (MSRDC), मुंबई (शिबिर कार्यालय, पुणे) येथे बदली.

​राजकीय दबावास थारा नाही; थेट शिस्तभंगाचा इशारा

​शासनाने आदेशात अत्यंत कडक भूमिका घेतली असून सर्व बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. पदस्थापनेत फेरबदल करण्यासाठी किंवा बदली रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास अथवा अर्ज सादर केल्यास, तो 'महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९' मधील नियम २३ चा भंग समजून संबंधितांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम भरण्यात आला आहे.

​मुदतीत रुजू न झाल्यास ‘अकार्यदिन’ (Dies Non) लागणार!

​नवीन नियुक्तीच्या ठिकाणी निर्धारित वेळेत रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलली जातील. त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा ‘अकार्यदिन’ (Dies Non) म्हणून गृहीत धरला जाईल, ज्यामुळे सेवाखंड आणि वेतन कपातीची टांगती तलवार अधिकाऱ्यांवर असेल.

​निवडणूक कर्तव्यावरील अधिकाऱ्यांना तूर्त दिलासा

​आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या अधिकाऱ्यांची सेवा निवडणूक आयोगाने मतदान किंवा इतर निवडणूक प्रक्रियेसाठी अधिग्रहित केली आहे, त्यांना निवडणूक कार्य पूर्ण होईपर्यंत नवीन पदावर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करू नये, अशा स्पष्ट सूचना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार देण्यात आल्या आहेत.