single-post

​आमदार महेश शिंदे यांच्या निधीतून साकारलेल्या 'कैलास स्मशानभूमी'चे १८ जुलै रोजी लोकार्पण!

​नगराध्यक्षा दिपालीताई बर्गे व महेश बर्गे यांची माहिती; कोरेगावच्या वैभवात पडणार आणखी एक भर

14 July, 2026

Jarandeshwar samachar 

​कोरेगाव (प्रतिनिधी) : कोरेगाव शहराच्या नागरी सुविधांमध्ये मोलाची भर घालणाऱ्या ‘श्री कैलास स्मशानभूमी’ या आधुनिक व सुसज्ज प्रकल्पाचे लोकार्पण शनिवार, दिनांक १८ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. कोरेगाव नगरपंचायत हद्दीतील श्री केदारेश्वर मंदिराच्या पाठीमागे उभारण्यात आलेल्या या स्मशानभूमीचे उद्घाटन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. दिपालीताई महेश बर्गे यांनी दिली.

​या संदर्भात माहिती देताना दीपालीताई महेश बर्गे यांनी सांगितले की, हा प्रकल्प आमदार महेश शिंदे यांच्या आमदार निधीतून साकारण्यात आला असून, कोरेगाव शहरातील नागरिकांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज अंत्यसंस्कार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने याची उभारणी करण्यात आली आहे. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात आला आहे.

​स्मशानभूमी परिसरातील प्रमुख वैशिष्ट्ये: ​अंत्यविधीसाठी आवश्यक असलेल्या सर्व आधुनिक सुविधा. ​अंत्ययात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी प्रशस्त बैठक व्यवस्था. ​परिसर सुशोभीकरण, अंतर्गत रस्ते आणि उत्तम स्वच्छता. ​नागरिकांना सन्मानपूर्वक व सुलभ पद्धतीने अंत्यसंस्कार करता यावेत या दृष्टीने नियोजन. ​विकासकामांना गती : "आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव शहरात विविध विकासकामांना गती मिळाली आहे.

रस्ते, पायाभूत सुविधा, सार्वजनिक उपयोगाचे प्रकल्प आणि नागरी सुविधा यांवर विशेष भर देण्यात येत असून, त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून ‘श्री कैलास स्मशानभूमी’चा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे," असे महेश बर्गे यांनी नमूद केले. नगरपंचायतीच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

​नगराध्यक्षा सौ. दिपालीताई महेश बर्गे यांनीही या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले. नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा नगरपंचायतीचा प्रयत्न कायम राहील, असे सांगून शहराच्या विकासात लोकसहभागाला आणि नागरिकांच्या सहकार्याला त्यांनी विशेष महत्त्व दिले आहे .

​नागरिकांना उपस्थितीचे आवाहन : या लोकार्पण सोहळ्यास कोरेगाव शहरातील ग्रामस्थ व विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच कोरेगाव शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उ उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन नगराध्यक्ष दीपालीताई बर्गे, व कोरेगाव नगरपंचायत प्रशासन व आमदार महेशदादा शिंदे विचारमंच यांच्या वतीने करण्यात येत आहे.