आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या निवेदनाला यश
खामगाव दुर्घटनेतील पीडित कुटुंबाला तातडीची मदत; निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
13 July, 2026
जरंडेश्वर समाचार
सातारा, दि. १३ जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा (प्रतिनिधी) : फलटण तालुक्यातील खामगाव येथे महावितरणच्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीच्या दुर्घटनेत पारधी (शिंदे) समाजातील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड (बापू) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर निवेदन सादर करून पीडित कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत, पुनर्वसन व दोषींवर कारवाईची मागणी केली होती. या निवेदनाची प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याने गायकवाड यांच्या पाठपुराव्याला प्राथमिक यश मिळाले आहे.
निवेदन स्वीकारल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी तत्काळ फलटण येथील महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून पीडित कुटुंबाला तातडीची मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. तसेच शासनाच्या विविध योजनांमधून आवश्यक ती मदत, आर्थिक सहाय्य आणि पुनर्वसनासाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
अशोक गायकवाड यांनी निवेदनात अपघातात मृत्यू झालेल्या चारही व्यक्तींच्या कुटुंबाची अत्यंत बिकट परिस्थिती प्रशासनासमोर मांडली. सात महिन्यांची गर्भवती महिला, लहान मुले आणि उर्वरित वारसांचे पुनर्वसन, मृतांच्या नावातील शासकीय नोंदीतील त्रुटी दूर करणे, महावितरणकडून नुकसानभरपाई, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष मदत, शासकीय घरकुल व जमीन, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी या प्रकरणाकडे संवेदनशीलतेने पाहत प्रशासनामार्फत आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पीडित कुटुंबाला तातडीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू झाल्याची माहिती आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी अशोक गायकवाड यांनी सांगितले की, "पीडित कुटुंबाला न्याय आणि शासनाच्या सर्व योजना मिळेपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चा पाठपुरावा सुरू राहील. प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो; मात्र संपूर्ण पुनर्वसन होईपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही."
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय