single-post

दिलेला शब्द पाळला! जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे यांच्याकडून वारकऱ्यांसाठी जनरेटर सुपूर्त

​सोनगाव (स. निंब) येथे ग्रामस्थांशी संवाद; विकासकामांबाबतही केली चर्चा

08 July, 2026

जरंडेश्वर समाचार 

​सातारा | जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा :

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोनगाव (स. निंब) येथील ग्रामस्थांना दिलेला शब्द जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे यांनी अखेर पाळला आहे. पायी दिंडी सोहळ्यासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची जनरेटरची अडचण दूर करत कांबळे यांनी गावात जनरेटर सुपूर्त केला. 'वारकरी संप्रदायाची सेवा ही समाजसेवेचाच एक भाग आहे', अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

​निवडणूक प्रचारादरम्यान सोनगावच्या ग्रामस्थांशी संवाद साधताना वारकऱ्यांना जनरेटर अभावी येणाऱ्या अडचणींची बाब कामेश कांबळे यांच्या निदर्शनास आली होती. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांना जनरेटर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करत त्यांनी जनरेटर सुपूर्त केला. पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलनामाचा गजर करत मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. "जनतेला दिलेला शब्द पाळणे आणि त्यांच्या विश्वासाला न्याय देणे हे माझे कर्तव्य आहे," असे प्रतिपादन कांबळे यांनी यावेळी केले.

​ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद

​जनरेटर सुपूर्त केल्यानंतर कामेश कांबळे यांनी गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, युवक व महिलांशी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. यावेळी गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेली विविध कामे, मूलभूत सुविधा, नागरिकांच्या अडचणी तसेच भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनीही विविध मागण्या मांडत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

​वारकऱ्यांची मोठी अडचण ओळखून, वेळेत जनरेटर उपलब्ध करून दिल्याबद्दल सोनगावचे ग्रामस्थ आणि वारकरी बांधवांनी जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे यांचे विशेष आभार मानले व त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.