शांत, शिस्तबद्ध वातावरणात प्राथमिक शिक्षक बँकेची ७९ वी वार्षिक सभा; आर्थिक प्रगतीसह नव्या कर्ज योजनेची घोषणा
वादाऐवजी विधायक चर्चेत ठराव मंजूर; ८.६५ टक्के व्याजदराने २० लाखांपर्यंत कर्जाची सुविधा
07 July, 2026
सातारा : प्रतिनिधी
सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा अनेकदा गदारोळ, आरोप-प्रत्यारोप आणि वादामुळे चर्चेत येतात. मात्र, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा यंदा शांत, संयमी आणि विधायक वातावरणात पार पडली. सभेत बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना सभासदांसाठी नव्या कर्ज योजनेची घोषणा करण्यात आली. काही सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही संचालक मंडळाने समर्पक उत्तरे दिली.
बँकेचे अध्यक्ष विजय डमाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत वार्षिक अहवाल, लेखापरीक्षण अहवाल आणि विविध विषयांवरील ठराव मंजूर करण्यात आले. निष्क्रिय सभासदांना पुन्हा बँकेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष कर्ज योजना सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या योजनेअंतर्गत १५ जुलैपर्यंत ८.६५ टक्के व्याजदराने २० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून, सभासदांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती देताना, गतवर्षीच्या तुलनेत कर्जवाटपात ३०.५७ कोटी रुपयांची वाढ झाल्याचे सांगण्यात आले. ३१ मार्चअखेर बँकेच्या ठेवी ७३५ कोटी रुपये, कर्जवाटप ४८९ कोटी रुपये, भांडवली गुंतवणूक ३२४ कोटी रुपये, तर खेळते भांडवल ८६४ कोटी रुपयांवर पोहोचल्याचे सभेत नमूद करण्यात आले. याशिवाय गुंतवणुकीत १६.४१ कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहितीही देण्यात आली.
सामाजिक उत्तरदायित्व जपत दिवंगत सभासदांच्या वारसांना सुमारे ३ कोटी ३० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली असून, आजारपणासाठी १५२ सभासदांना १४ लाख ७७ हजार रुपयांचे साहाय्य वितरित करण्यात आल्याची माहिती सभेत देण्यात आली.
सभेदरम्यान कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे धनसिंग सोनवणे, बाजीराव शेटे, प्रशांत मोरे आणि उदय भंडारे यांनी बँकेच्या कारभारातील पारदर्शकतेसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर संचालक मंडळाने सविस्तर स्पष्टीकरण देत सभासदांच्या शंकांचे निरसन केले.
यावेळी उपाध्यक्ष नितीन फरांदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब भोसले यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा आणि प्राथमिक शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते दीपक भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला.
एकेकाळी पोलीस बंदोबस्तात पार पडणाऱ्या या बँकेच्या सभा आता शांत, शिस्तबद्ध आणि विधायक चर्चेच्या वातावरणात होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सहकार क्षेत्रात विश्वास, पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त या तिन्ही बाबींना प्राधान्य देत बँकेने घडवून आणलेला हा सकारात्मक बदल इतर सहकारी संस्थांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतो, अशी भावना सभासदांनी व्यक्त केली.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय