मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा ना. शिवेंद्रसिंहराजे; कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना केल्या सूचना
वाहनचालक, प्रवाशी आणि स्थानिकांची गैरसोर दूर करण्यासाठी सर्वप्रकरची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा
22 February, 2025
सातारा दि.२२(प्रतिनिधी)- मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरु असून हे काम रखडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. या महामार्गावरील विविध पूल तसेच कशेडी बोगदा आणि महामार्गाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण झाले पाहिजे. या महामार्गाचे उर्वरित काम दर्जेदार करून तातडीने पूर्ण करा, अशा सक्त सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गाचा पाहणी दौरा केला. या दौऱ्याची सुरुवात पळसपे फाटा (पनवेल) येथून झाली. पळसपे फाटा, पेण, साखरपाडा, वाशी नाका, पेण रेल्वे स्टेशन, पालखार, कोलेटी, कोलाड, महाड, कशेडी बोगदा, संगमेश्वर (आंबेड), रत्नागिरी असा पाहणी दौरा झाला. यावेळी ठिकठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी आवश्यक त्या सूचना केल्या. या दौऱ्यावेळी मंत्री भरतशेट गोगावले, आ. किरण सामंत, आ. प्रशांत ठाकूर, माजी आ. रवीशेठ पाटील, राज्यसभा खा. धैर्यशील पाटील, माजी आ. अनिकेत तटकरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मालवण, राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उभारण्यात येत असलेल्या कामाचा आढावा रत्नागिरी येथील बैठकीत घेण्यात आला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध रस्ते, हॅम, एबीडी, सीआरएफ, नाबार्ड आदी रस्त्यांचा आढावा ना. शिवेंद्रसिंहराजेंनी घेतला. पाली ता. रत्नागिरी येथील पुलाची पाहणी केली. कडेशी बोगदाची उर्वरित लेन येत्या मार्च अखेरपर्यंत सुरु करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. वाहनचालक, प्रवाशी आणि स्थानिकांची गैरसोर दूर करण्यासाठी सर्वप्रकरची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.