single-post

अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी साताऱ्यात मातंग समाजाचा महाविराट महामोर्चा

हजारो समाजबांधवांचा सहभाग; उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी मागणी

17 June, 2026

 जरंडेश्वर समाचार 

सातारा, दि. १७ जून २०२६ (प्रतिनिधी)

अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून वंचित व अतिमागास घटकांना न्याय मिळावा, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ रोजीच्या निर्णयानुसार राज्य शासनाने उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी सातारा जिल्हा मातंग समाजाच्या वतीने बुधवारी (दि. १७) सातारा शहरात भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासह शहरातील प्रमुख मार्गांवर मोठी गर्दी झाली होती.

महापुरुषांना अभिवादन करून महामोर्चाची सुरुवात

महामोर्चाची सुरुवात सातारा येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर क्रांतिगुरू लहुजी साळवे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी "संविधानाचा आधार, उपवर्गीकरणाचा निर्धार", "मातंग समाज जागा झाला, हक्कासाठी रस्त्यावर आला", "सामाजिक न्याय आमचा हक्क आहे" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिस्तबद्ध पद्धतीने निघालेला महामोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

उपवर्गीकरणासाठी निर्णायक लढ्याचा इशारा

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी दहिवडी पंचायत समितीच्या सदस्या सौ. गौरी दिलीप तुपे यांनी मार्गदर्शन करताना उपवर्गीकरणाचा मुद्दा हा सामाजिक न्यायाशी निगडित असल्याचे सांगितले.

त्या म्हणाल्या, "राखरखत्या उन्हाची पर्वा न करता मातंग समाज आज आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकवटला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ च्या निर्णयानुसार देशातील काही राज्यांमध्ये उपवर्गीकरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनानेही आगामी पावसाळी अधिवेशनात यासंदर्भात ठोस कायदा करून उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करावी. समाजाच्या घटनात्मक हक्कांसाठी आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत संघर्ष करण्यास तयार आहोत."

त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मान्यवरांची आक्रमक भूमिका

सभेमध्ये समाजातील विविध मान्यवरांनी आपली मते मांडली. यामध्ये किशोर गालफाडे, विजय भोंडवे, नितीन तुपे, बाजीराव नाईक, डॉ. पल्लवी साठे, अण्णा वायदंडे, मोर्चाचे नेतृत्व मातंग समाजाचे नेते अमर गायकवाड, अण्णा वायदंडे, अमोल पाटोळे, गणेश वाघमारे, अशोक भिसे, डॉ. रमाकांत साठे, उमेश चव्हाण, सुरेश बोतालजी, तानाजी घाडगे,मंगला वायदंडे, सुनंदा कांबळे, खेड लोनंदचे नितीन वायदंडे,जनाबाई पाटोळे, संगीता साठे, जयश्री बडेकर, संजय कांबळे, विशाल चव्हाण, जगन्नाथ कांबळे, प्रदीप ढोबळे, यांच्यासह मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते.  सत्यवान कमाने यांच्यासह अनेक वक्त्यांचा समावेश होता.

वक्त्यांनी अनुसूचित जातींतील सर्व घटकांना समान संधी, प्रतिनिधित्व आणि न्याय मिळण्यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी शासनाने विलंब न करता निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

आंदोलनाची ठळक वैशिष्ट्ये
ऐतिहासिक गर्दी

संपूर्ण सातारा जिल्ह्यासह ग्रामीण भागातून हजारो महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने महामोर्चात सहभागी झाले होते. उपस्थितीच्या दृष्टीने हा मोर्चा अलीकडील काळातील सर्वात मोठ्या सामाजिक आंदोलनांपैकी एक मानला जात आहे.

स्वतःच्या खर्चाने सहभाग

मोर्चामध्ये सहभागी झालेल्या बहुतांश समाजबांधवांनी स्वतःच्या खर्चाने आणि स्वतःच्या वाहनांद्वारे उपस्थिती लावली. यामुळे समाजातील एकजूट आणि प्रश्नांबाबतची जागरूकता अधोरेखित झाली.

पक्षविरहित लोकचळवळ

मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली नसून सामाजिक न्याय आणि घटनात्मक हक्कांच्या मागणीसाठी उभारलेली लोकचळवळ असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. त्यामुळे या आंदोलनाला समाजाच्या विविध स्तरांतून पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सभेनंतर मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने सातारा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. उपवर्गीकरणाची अंमलबजावणी, शैक्षणिक व रोजगार क्षेत्रातील प्रतिनिधित्व, तसेच समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

शिस्तबद्ध सांगता

महामोर्चाच्या अखेरीस अण्णा वायदंडे यांनी उपस्थित समाजबांधवांचे आभार मानले. शांतता, शिस्त आणि एकजुटीचे दर्शन घडविणाऱ्या या महामोर्च्याची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी साताऱ्यात निघालेल्या या विराट महामोर्चाने शासनाचे लक्ष वेधून घेतले असून, आगामी काळात या प्रश्नावर राज्य शासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागले आहे.