single-post

​कोरेगाव विधानसभा मतदारसंघात बदलाची चाहूल? जनता नव्या नेतृत्वाच्या शोधात असल्याची चर्चा

​दोन कार्यकाळांनंतर मतदारांच्या मनात बदलाची भावना; नव्या नेतृत्वाच्या शोधाला वेग

30 June, 2026

जरंडेश्वर समाचार 

राजकीय वार्तापत्र कोरेगाव विधानसभा मतदारसंघ

-सुरेश बोतालजी संपादक 

​कोरेगाव | जरंडेश्वर समाचार वृत्त जनससेवा :  कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यास अजून काही महिने बाकी असले, तरी येथील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापू लागले आहे. "यावेळी मतदार बदलाचा निर्णय कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनता घेणार  का?" हा एकच प्रश्न सध्या संपूर्ण मतदारसंघात चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे.

​स्थानिक राजकीय विश्लेषकांनुसार, कोरेगाव मतदारसंघाचा इतिहास पाहता एक निश्चित पॅटर्न वारंवार दिसून आला आहे. येथे सामान्यतः दोन कार्यकाळांनंतर मतदारांनी सत्ताधारी नेतृत्वाला पर्याय देत नवा चेहरा निवडला आहे. त्यामुळे यंदाही मतदारसंघात अशाच प्रकारची सुप्त लाट किंवा भावना मतदारांमध्ये आहे का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

​आमदार शंकरराव जगताप हे अपवाद सोडले तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने दहा वर्षानंतर आमदार बदललेला आहे. 

आमदार डॉ. श्रीमती शालिनीताई पाटील यांनी कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे सहकारी साखर कारखाना उभारून शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या कार्यकाळात ऊस शेतीला मोठी चालना मिळाली आणि ग्रामीण भागाचा कायापालट झाला. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे करूनही मतदारांनी पुढील निवडणुकीत त्यांना पुन्हा संधी दिली नाही.

​त्यानंतरच्या काळात आमदार शशिकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघात रस्ते विकास, पाणीपुरवठा योजना, कोरेगाव शहरातील दहा कोटी रुपयांचे ग्रामीण रुग्णालय आणि भव्य प्रशासकीय इमारत यांसह अनेक महत्त्वाची पायाभूत कामे मार्गी लागली. या विकासकामांचा प्रचारही प्रभावीपणे करण्यात आला; परंतु त्यांच्याही दोन कार्यकाळांनंतर मतदारांनी पुन्हा एकदा नेतृत्व बदलालाच कौल दिला.

एकूणच कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेची मानसिकता ही नेतृत्व बदलाची असते असे एकूण दहा वर्षाच्या कालावरून सिद्ध झाले आहे. आता पाहायचे आहे या दहा वर्षानंतर नेतृत्व बदल होते की पुन्हा तेच नेतृत्व हॅट्रिक करते का? याकडे आता मतदार संघातील व महाराष्ट्र जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात लोक आता नव्या चेहऱ्याच्या शोधात असून नवीन चेहरे उद्या येणार का याकडे आता लोकांचे लक्ष लागले आहे मात्र व्ह्यू रचना त्या पद्धतीने मतदारसंघात काही राजकीय तज्ञ करीत आहेत अशी माहिती  विश्वसनीय सूत्रांकडून  मिळत आहे.

​आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव मतदारसंघात काही नव्या चेहऱ्यांनी आणि तरुण नेतृत्वाने आपली मोर्चेबांधणी अत्यंत प्रभावीपणे सुरू केली आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय उपक्रमांच्या माध्यमातून हे संभाव्य इच्छुक उमेदवार थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीला अद्याप काही अवधी शिल्लक असल्याने, येत्या काळात आणखी काही नवे इच्छुक राजकीय रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. पक्षांतर्गत बदल, संभाव्य आघाड्या-युत्या, प्रलंबित स्थानिक प्रश्न आणि मतदारांचा नेमका मूड हेच घटक आगामी निवडणुकीच्या अंतिम निकालावर थेट प्रभाव टाकणार आहेत.

​सध्याच्या सुशिक्षित आणि जागृत मतदारांच्या अपेक्षा केवळ रस्ते-पाणी यांसारख्या पायाभूत विकासकामांपुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत. लोकप्रतिनिधीची सर्वसामान्यांना असणारी सहज उपलब्धता, २४ तास सतत राहणारा जनसंपर्क, विश्वासार्हता आणि मतदारसंघाच्या विकासाचा भविष्यातील स्पष्ट दृष्टीकोन (व्हिजन) या बाबींनाही मतदार आता तितकेच महत्त्व देत आहेत. लोकांना आपलाच आमदार वाटायला लागला पाहिजे तरच तो आमदार या मतदारसंघात टिकतो  अन्यथा त्याला कात्रज घाट या मतदारसंघातील जनता दाखवत असते हे तितकेच सत्य आणि वास्तव आहे. त्यामुळे यंदा कोरेगाव मतदारसंघात परिवर्तनाची लाट येणार की विद्यमान नेतृत्व आपली पकड कायम राखणार, हे येणारा काळच ठरवेल.

​(टीप: या वार्तेतील सर्व उल्लेख स्थानिक राजकीय चर्चा व विश्लेषणावर आधारित असून, संबंधित कोणत्याही व्यक्तीने अथवा पक्षाने अद्याप आपली अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही.)