single-post

कोरेगावला मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलची प्रतीक्षा

१०० ते २०० बेडच्या अत्याधुनिक रुग्णालयाची लोक पँथरकडून मागणी

26 June, 2026

जरंडेश्वर समाचार 

कोरेगाव, |जरंडेश्वर समाचार वृत्त जनससेवा:
सातारा जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कोरेगाव शहरात १०० ते २०० बेडचे अत्याधुनिक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशी मागणी लोक पँथरचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार सुरेश बोतलजी यांनी केली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर, दर्जेदार आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सातारा जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेनुसार कोरेगाव हे मध्यवर्ती शहर असल्याने येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचा लाभ केवळ कोरेगावपुरता मर्यादित राहणार नाही. मान, दहिवडी, म्हसवड, खटाव, वडूज, मायणी, चितळी, सावळी, रहिमतपूर, वाठार, किरोली, फळटण, बरड, साखरवाडी, आदाकी, लोणंद, खंडाळा, वाठार स्टेशन तसेच परिसरातील शेकडो गावांतील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ शकतील. या भागांतील रुग्णांना अवघ्या ४० ते ५० किलोमीटरच्या अंतरावर उच्च दर्जाची उपचार सेवा मिळू शकते.

सध्या गंभीर रुग्णांना सातारा, कराड, पुणे किंवा कोल्हापूर येथे उपचारासाठी जावे लागते. अपघात, हृदयरोग, मेंदूविकार, किडनीचे आजार, अतिदक्षता उपचार तसेच तातडीच्या शस्त्रक्रियांसाठी होणारा विलंब अनेकदा जीवघेणा ठरतो. त्यामुळे सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल कोरेगावमध्ये उभारणे ही काळाची गरज असल्याचे सुरेश बोतलजी यांनी नमूद केले.

कोरेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक इमारतीला पूरक अशी स्वतंत्र इमारत उभारून आवश्यक मनुष्यबळ, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केल्यास १०० ते २०० बेडचे सुसज्ज मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अल्पावधीत सुरू करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळण्याबरोबरच वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल. आरोग्य सुविधा हा विकासाचा मूलभूत पाया असून ग्रामीण नागरिकांना त्यांच्या परिसरातच आधुनिक उपचार मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रस्तावित रुग्णालयामध्ये २४ तास आपत्कालीन सेवा, ट्रॉमा केअर सेंटर, हृदयरोग विभाग, न्यूरोलॉजी, मेंदू व मज्जासंस्था उपचार विभाग, किडनी व डायलिसिस सेंटर, प्रसूती व स्त्रीरोग विभाग, बालरोग विभाग, आयसीयू व क्रिटिकल केअर युनिट, अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, प्रयोगशाळा आणि औषधालय अशा सर्व सुविधा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तसेच केंद्र सरकारचे केंद्रीय आरोग्यमंत्री यांना ई-मेलद्वारे आणि प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सुरेश बोतलजी यांनी दिली. कोरेगावमध्ये अत्याधुनिक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय शासनाने लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

कोरेगावकरांची एकच अपेक्षा – आधुनिक, सुसज्ज आणि सर्वांसाठी परवडणारे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल!