single-post

सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘घोडेबाजार’ची चर्चा; कोरेगाव नगरपंचायतीचे नगरसेवक सहलीवर जाणार?

क्रॉस वोटिंगच्या भीतीने राजकीय हालचालींना वेग • सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीमुळे स्थानिक राजकारण तापले • नगरसेवकांना ‘सुरक्षित’ ठेवण्यासाठी सहलीचे नियोजन? • भाजप, राष्ट्रवादीसह महायुतीतील नेते अलर्ट मोडवर • कोरेगाव नगरपंचायतीतील राजकीय घडामोडींना वे

10 June, 2026

जरंडेश्वर समाचार 

-सुरेश बोतालजी

कोरेगाव : जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:
सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून संभाव्य ‘क्रॉस वोटिंग’ टाळण्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांकडून आपल्या मतदार प्रतिनिधींना सांभाळण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरेगाव नगरपंचायतीतील काही नगरसेवकांसह सातारा जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपरिषद, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद सदस्यांना लवकरच सहलीवर पाठविण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

विधान परिषद निवडणुकीत मोठा ‘घोडेबाजार’ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्यांवर विशेष लक्ष ठेवले जात असल्याचे बोलले जात आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळी झालेला राजकीय गोंधळ अद्यापही जिल्हावासीयांच्या स्मरणात असून, त्याच पार्श्वभूमीवर भाजपसह महायुतीतील नेत्यांमध्ये ‘क्रॉस वोटिंग’ची भीती असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

या निवडणुकीत मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्याच्या घडीला हे दोन्ही नेते महायुतीसोबत राहणार असल्याचे संकेत मिळत असले, तरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी झालेल्या राजकीय घडामोडींमुळे या दोन्ही नेत्यांना मोठा फटका बसल्याची चर्चा होती. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत त्याची ‘राजकीय परतफेड’ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभयसिंह जगताप हे पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरले असून विजयासाठी सर्व प्रकारचे राजकीय डावपेच वापरण्याची तयारी त्यांनी केल्याचे समजते. दुसरीकडे भाजपकडूनही मोठ्या प्रमाणात निवडणूक यंत्रणा सक्रिय केली जाणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. मात्र भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम हे स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदारांपर्यंत कितपत प्रभावीपणे पोहोचतात आणि त्यांचे वैयक्तिक संबंध कितपत मजबूत आहेत, यावर अनेक राजकीय समीकरणे अवलंबून राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद मोठी असल्याचे राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या राजकीय ‘करिष्म्या’ची आठवण यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आली असून, यावेळीही ते विधान परिषद निवडणुकीत तशीच प्रभावी भूमिका बजावणार का, याबाबत जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झाली आहे.

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मजबूत मानली जात असताना सातारा जिल्ह्यात दोन्ही बाजूंकडे तुल्यबळ संख्याबळ असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. भाजपची संघटनात्मक ताकद अधिक असल्याचे बोलले जात असले, तरी ‘क्रॉस वोटिंग’चा फटका भाजप उमेदवाराला बसू शकतो, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील भाजप नेते ‘अलर्ट मोड’वर आले असून कोरेगाव नगरपंचायतीतील अनेक नगरसेवकांसह जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांना काही दिवसांसाठी सहलीवर पाठविण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे.

कोरेगाव नगरपंचायतीची निवडणूक अवघ्या सहा ते सात महिन्यांवर येऊन ठेपली असून विद्यमान नगरसेवकांपैकी अनेकांना पुन्हा उमेदवारी किंवा विजयाची खात्री नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत जवळपास ७० टक्के नगरसेवक पुढील निवडणुकीत दिसणार नाहीत, अशीही चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.

त्यामुळे निवडणुकीपूर्वी काही नगरसेवक वेगळी भूमिका घेऊ शकतात, अशी भीती संबंधित नेत्यांना वाटत असल्यानेच त्यांना ‘सुरक्षित’ ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे. आगामी काही दिवसांत सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(टीप : वरील वृत्त हे राजकीय वर्तुळातील चर्चा, सूत्रांकडून मिळालेली माहिती आणि स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींवर आधारित असून संबंधित पक्ष किंवा नेत्यांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.)