कोरेगाव नगरपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर करा-सुरेश बोतालजी
सातारा जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन,वाढती लोकसंख्या, एमआयडीसी, शैक्षणिक विस्तारामुळे मागणी जोर धरू लागली सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश बोतालजी यांचे मुख्यमंत्री, नगरविकास मंत्र्यांना निवेदन
09 June, 2026
जरंडेश्वर समाचार
कोरेगाव : सातारा जिल्ह्याचे मध्यवर्ती शहर म्हणून ओळख असलेल्या कोरेगाव नगरपंचायतीचे रूपांतर तातडीने नगर परिषदेमध्ये करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश बोतालजी यांनी राज्य शासनाकडे केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री तसेच सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन आज सादर करण्यात येणार असल्याची माहिती बोतालजी यांनी दिली आहे.
कोरेगाव शहर हे सातारा जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात वसलेले असून, गेल्या काही वर्षांत शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेली एमआयडीसी, वाढणाऱ्या व्यापारी संकुलांची संख्या, शैक्षणिक संस्था, ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर आणि वाढती नागरी वस्ती यामुळे कोरेगाव शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.
“लोकसंख्या ४० हजारांच्या पुढे”
सुरेश बोतालजी यांनी निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या घडीला कोरेगाव शहराची लोकसंख्या ४० हजारांच्या पुढे गेली असल्याचा अंदाज आहे. आगामी जनगणनेत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून, नगरपंचायतीच्या विद्यमान प्रशासकीय चौकटीत वाढत्या शहराचा विकास मर्यादित ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
कोरेगाव हे सातारा जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे तालुक्यातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात शिक्षण, व्यवसाय, आरोग्य सेवा आणि रोजगारासाठी शहराकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे शहरावर नागरी सुविधांचा ताण वाढत चालला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नगर परिषद झाल्यास विकासाला चालना?
नगर परिषद दर्जा मिळाल्यास कोरेगाव शहराला राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध नागरी विकास योजनांतून अधिक निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यातून रस्ते, पाणीपुरवठा, गटारे, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट, उद्याने, व्यापारी संकुले, सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि शहर नियोजनाच्या कामांना गती मिळेल, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
तसेच नगर परिषदेमुळे शहराचा स्वतंत्र विकास आराखडा तयार होऊन भविष्यातील वाढ लक्षात घेऊन नियोजनबद्ध नागरीकरण होऊ शकते, असे मतही व्यक्त करण्यात आले आहे.
“कोरेगावला स्वतंत्र ओळख मिळावी”
कोरेगाव शहर हे शैक्षणिक, व्यापारी आणि औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असलेले केंद्र आहे. त्यामुळे या शहराला भविष्यात अधिक सक्षम नागरी प्रशासनाची गरज भासणार असून, नगर परिषद हा दर्जा मिळाल्यास शहराला स्वतंत्र ओळख आणि विकासाची नवी दिशा मिळेल, असे सुरेश बोतालजी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कोरेगाव नगरपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्याच्या मागणीमुळे तालुक्यात राजकीय, सामाजिक आणि व्यापारी स्तरावर चर्चा सुरू झाली असून, राज्य शासन याबाबत काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय