single-post

एससी आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करा; ५९ वंचित जातींना न्याय मिळणार – सुरेश बोतालजी

एससी उपवर्गीकरणामुळे ५८ जातींना विकासाची नवी संधी आरक्षणाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपवर्गीकरण गरजेचे सामाजिक न्यायासाठी एससी आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करा वंचित घटकांच्या प्रगतीचा मार्ग म्हणजे एससी उपवर्गीकरण – बोतालजी ५९ जातींना समान न्

12 June, 2026

जरंडेश्वर समाचार 

कोरेगाव : जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:-

अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश बोतालजी यांनी केली आहे. एससी प्रवर्गातील सर्व जातींना समान संधी मिळावी, विकासाच्या प्रवाहात प्रत्येक समाजघटक सहभागी व्हावा आणि आरक्षणाचा लाभ तळागाळातील वंचित घटकांपर्यंत पोहोचावा, यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात बोतालजी म्हणाले की, अनुसूचित जाती प्रवर्गात राज्यात एकूण ५९ जातींचा समावेश आहे. मात्र आरक्षणाचा अपेक्षित लाभ अनेक जातींपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे एससी प्रवर्ग कायम ठेवून त्यामध्ये उपवर्गीकरणाची अंमलबजावणी केल्यास मागास आणि वंचित राहिलेल्या जातींनाही शिक्षण, नोकरी, राजकीय प्रतिनिधित्व आणि विविध शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळू शकेल.

"आमचा कोणत्याही समाजाला विरोध नाही. सर्व समाजघटकांनी प्रगती करावी, हीच आमची भूमिका आहे. मात्र आरक्षणाचा लाभ काही मोजक्या घटकांपुरता मर्यादित न राहता सर्व ५९ जातींपर्यंत पोहोचला पाहिजे. उपवर्गीकरणामुळे सामाजिक न्यायाची संकल्पना अधिक बळकट होईल," असे त्यांनी स्पष्ट केले.

उपवर्गीकरणामुळे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागे राहिलेल्या समाजघटकांना संधी उपलब्ध होईल. त्यामुळे अनेक कुटुंबांना रोजगार, उच्च शिक्षण आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या मागणीसह विविध सामाजिक प्रश्नांबाबत सोमवार, दि. १५ रोजी सकाळी ११ वाजता कोरेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात येणार आहे. या निवेदनाद्वारे एससी आरक्षणातील रिक्त पदे भरणे, कंत्राटीकरण थांबविणे, खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करणे, एससी विकास निधीचा पूर्ण वापर करणे, जातनिहाय जनगणना करणे, लहुजी आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे, दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना प्रभावीपणे राबविणे तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी करण्यात येणार आहे.

या निवेदनासाठी मातंग समाजासह सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सुरेश बोतालजी यांनी केले आहे.