कोरेगावच्या विकासशिल्पकार आ. महेश शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करावी सुरेश बोतालजी यांची मागणी
“विकासाची ओळख जपण्यासाठी पुतळा उभारावा” — सुरेश बोतालजीकोरेगावच्या विकासासाठी ऐतिहासिक योगदानाची नागरिकांकडून दखल • आझाद चौक किंवा भाजी मंडई परिसरात पुतळा उभारण्याची मागणी • बसस्थानक, भाजी मंडई, रस्ते, पाणी योजना
03 June, 2026
कोरेगाव : जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांत झालेल्या ऐतिहासिक आणि सर्वांगीण विकासकामांच्या पार्श्वभूमीवर विकासशिल्पकार आमदार महेश शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी भारतीय बहुजन सेना संस्थापक अध्यक्ष सुरेश बोतालजी यांनी केली आहे. यासंदर्भात कोरेगाव नगरपंचायतीला लवकरच निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कोरेगाव शहरातील आझाद चौक तसेच आधुनिक भाजी मंडई परिसरात आ. महेश शिंदे यांचा भव्य-दिव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत असल्याचे सुरेश बोतालजी यांनी सांगितले. कोरेगाव शहराचा बदललेला चेहरामोहरा, ग्रामीण भागातील वाढलेला विकासाचा वेग आणि मतदारसंघात निर्माण झालेल्या आधुनिक सुविधांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार महेश शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विकासाची अभूतपूर्व गंगा आणल्याचे मत समर्थकांकडून व्यक्त केले जात आहे. कोरेगावचे अत्याधुनिक बसस्थानक, पंचायत समिती इमारतीचे नूतनीकरण, आझाद चौक सुशोभीकरण, आधुनिक भाजी मंडई, शासकीय विश्रामगृहाचे आधुनिकीकरण, शहरातील आणि ग्रामीण भागातील सिमेंट काँक्रीट रस्ते, जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना, डिजिटल शाळा, आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण यांसारखी अनेक विकासकामे आज प्रत्यक्षात दिसून येत आहेत.
ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचे काम आ. शिंदे यांनी केले असून युवकांना रोजगार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, सामाजिक उपक्रम तसेच गरजू नागरिकांना वेळोवेळी मदतीचा हात देण्याची भूमिका त्यांनी सातत्याने निभावली असल्याचे सुरेश बोतालजी यांनी म्हटले आहे.
मतदारसंघातील विकासकामांमुळे कोरेगाव शहराला आधुनिक आणि नियोजनबद्ध स्वरूप प्राप्त होत असून, कोरेगाव हे सातारा जिल्ह्यातील वेगाने विकसित होणारे शहर म्हणून ओळख निर्माण करत आहे. त्यामुळे विकासकामांची आठवण आणि भावी पिढ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने आ. महेश शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत असल्याचेही बोतालजी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संबंधित शासकीय नियम व आवश्यक परवानग्यांची पूर्तता करून नगरपंचायतीने या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय