single-post

समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम साहित्यिकांनी केले

वर्तमान काळात साहित्यिकांवर महत्वपूर्ण जबाबदारी -शरद पवार

21 February, 2025

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलेच साहित्य संमेलन दिल्ली येथे होत असून त्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याबद्दल विशेष आनंद असल्याचे सांगून श्री.पवार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल श्री. मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, संत परंपरेपासूनच सर्वसमावेशक विचार मांडण्याचे काम मराठी साहित्यिकांनी सातत्याने केले. महिला साहित्यिकांच्या योगदानाने मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम साहित्यिकांनी केले. साहित्यिकांची जबाबदारी वाढली असून समाजाला  समाजसुधारकांच्या विधायक मार्गाने नेण्याचे काम साहित्यिकाने करण्याची आवश्यकता आहे. नव्या पिढीला पुस्तकांशी बांधून ठेवण्यासाठी नव्या माध्यमांचा कल्पकतेने वापर करायला हवा. नव्या पिढीमध्ये साहित्याची गोडी टिकून राहिली तरच साहित्याला भवितव्य असेल. महिलांना अध्यक्षपदाचा मान  अधिकाधिक मिळाला तर महिला साहित्यिकांची परंपरा आणखी वेगाने पुढे जाईल. राजकारण आणि साहित्यातील संबंध पूर्वीपासून आहे, ते परस्पराला पूरक आहेत असेही श्री.पवार म्हणाले.