केळघर-महाड बोगदा तातडीने उभारण्याची मागणी; 'लोक पँथर'चे संस्थापक सुरेश बोतालजी यांचा आमरण उपोषणाचा इशारा
आंबेनळी घाटात प्रशासन अजून किती बळी घेणार?
26 May, 2026
सातारा | जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा :
सातारा आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा, निसर्ग सौंदर्याने नटलेला आंबेनळी घाट आता प्रवाशांसाठी 'मृत्यूचा सापळा' बनू लागला आहे. गेल्या काही वर्षांत या घाटाने अनेक भीषण अपघात पाहिले असून, पण नुकताच स्कार्पिओ दरीत कोसळली आणि आठ युवक मृत्युमुखी पडले यातील आसगाव येथील पाच युवक होते त्यांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणार होता म्हणून या ठिकाणी तात्काळ बोगदा करावा जे पुढील अपघात टाळता येतील, दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळणे, वाहने खोल दरीत कोसळणे अशा घटनांमुळे शेकडो निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. "प्रशासन आंबेनळी घाटात अजून किती बळी घेणार?" असा संतप्त सवाल उपस्थित करत, आंबेनळी घाटाला पर्याय म्हणून 'केळघर-महाड बोगदा' तातडीने मंजूर करावा, अशी मागणी 'लोक पँथर'चे संस्थापक अध्यक्ष सुरेश बोतालजी यांनी केली आहे. यासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी यांना शुक्रवारी बोतालजी निवेदन सादर करणार आहेत.
भीषण अपघातांचा थरारक इतिहास आणि आकडेवारी
आंबेनळी घाटातील अपघातांचा इतिहास अत्यंत काळजाचा थरकाप उडवणारा आहे. अधिकृत आणि सामाजिक संस्थांच्या आकडेवारीनुसार, गेल्या एका दशकात या घाटात लहान-मोठे १५० पेक्षा अधिक अपघात झाले असून, यात १०० हून अधिक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
काळा शनिवार (२८ जुलै २०१८): दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला झालेला अपघात हा या घाटातील सर्वात मोठा आणि काळा डाग ठरला. या भीषण अपघातात तब्बल ३३ कर्मचाऱ्यांचा दरीत कोसळून जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.
याशिवाय दरवर्षी पावसाळ्यात सरासरी ५ ते ७ वाहने दरीत कोसळतात, तर दरडी कोसळून मार्ग बंद होण्याच्या घटनांमुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान व जीवितहानी होते.
तात्पुरती मलमपट्टी नको, कायमस्वरूपी पर्याय हवा!
निवेदनात म्हटले आहे की, महाबळेश्वरमार्गे कोकणात जाण्यासाठी आंबेनळी घाट हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. पर्यटन हंगाम आणि पावसाळ्यात येथे वाहनांची प्रचंड वर्दळ असते. मात्र, तीव्र वळणे, अरुंद रस्ता, दाट धुके आणि खचणाऱ्या कड्यांमुळे हा मार्ग अत्यंत अपघातप्रवण बनला आहे. प्रशासन दरवर्षी केवळ संरक्षक कठडे आणि फलक लावून तात्पुरती मलमपट्टी करते. परंतु, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आता ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे.
केळघर-महाड बोगदा हाच एकमेव मार्ग:
या चळवळीचे कार्यकर्ते सुरेश बोतालजी यांनी केळघर ते महाड दरम्यान बोगदा मार्ग उभारण्याच्या तांत्रिक आणि सामाजिक गरजेवर भर दिला. ते म्हणाले, "हा प्रकल्प केवळ प्रादेशिक विकासाचा विषय नसून लाखो नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि जगण्याशी संबंधित आहे. केळघर-महाड बोगदा झाल्यास सातारा आणि कोकणातील अंतर लक्षणीयरीत्या कमी होईल. वाहतूक सुलभ होऊन पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निष्पाप लोकांचे अपघात टाळता येतील."
...तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा!
या गंभीर प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. या लोकप्रतिनिधींनी केंद्रीय आणि राज्य पातळीवरून निधी उपलब्ध करून देऊन हा बोगदा प्रकल्प तातडीने सुरू करावा. प्रशासनाने आणि सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास, 'लोक पँथर'च्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'बेमुदत आमरण उपोषण' सुरू करण्यात येईल, इशारा सुरेश बोतालजी यांनी दिला आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय