महागाई ,शेतकऱ्यांचे, विद्यार्थी विद्यार्थिनीचे प्रश्ना संदर्भात, हुकूमशाही विरोधात २९ मे रोजी साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) भव्य जनआंदोलन! आमदार शशिकांत शिंदे यांचे आवाहन; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा सातारा: राज्यातील वाढती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे आवाहन; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार भव्य मोर्चा
26 May, 2026
सातारा:| जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:राज्यातील वाढती महागाई, शेतकरी-विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था या पार्श्वभूमीवर, महायुती सरकारविरोधात ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’ पक्षाच्या वतीने २९ मे रोजी साताऱ्यात भव्य जनआंदोलन छेडण्यात येणार आहे. “राज्यातील हुकूमशाही सरकारविरोधात आता जनतेचा आवाज बुलंद करण्याची वेळ आली आहे,” अशी आक्रमक हाक पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. २९ मे रोजी सकाळी ठीक १० वाजता स्थानिक 'राष्ट्रवादी भवन' येथून या भव्य मोर्चाला सुरुवात होणार असून, तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील विविध घटकांमध्ये सरकारबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यत्वे शैक्षणिक क्षेत्रातील गोंधळ, 'सीईटी २०२६' परीक्षा रद्द करण्याची मागणी, वारंवार होणारी पेपरफुटीची प्रकरणे आणि यामुळे नैराश्यातून विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या या गंभीर विषयांवर सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. याशिवाय, शेतकऱ्यांच्या पिकांना रखडलेला हमीभाव, गगनाला भिडलेली महागाई, महिलांवरील वाढते अत्याचार आणि सर्वसामान्यांवर होणारा अन्याय या ज्वलंत मुद्द्यांवरून प्रशासनाला धारेवर धरण्यात येणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
"या मस्तवाल सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी आम्ही येतोय, तुम्हीही या!"
— राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत आवाहन.
पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात सरकारवर अत्यंत कडक शब्दांत टीका करण्यात आली आहे. "सध्याचे सरकार जनसामान्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, त्यांच्यात प्रचंड अहंकार निर्माण झाला आहे. या मस्तवाल सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी जनतेनेच आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे," असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सरकारचा निषेध करावा, असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले आहे.
राज्यात सध्या शैक्षणिक गोंधळ आणि शेतकऱ्यांच्या कर्ज-हमीभावाचा प्रश्न कमालीचा पेटला आहे. विरोधकांकडून सातत्याने सरकारला या मुद्द्यांवरून घेरले जात आहे. अशा परिस्थितीत सातारा जिल्ह्यात होणाऱ्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या भावना थेट सरकारपर्यंत पोहोचवून त्यांना जाब विचारण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) केला आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय