कोरेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी 'बर्गे बंधूं'ची जोरदार चर्चा; आमदार महेश शिंदेंची लागणार कसोटी!
आमदार महेश शिंदेंच्या दोन्ही 'विश्वासू' शिलेदारांमध्ये नगराध्यक्षपदासाठी स्पर्धा!सत्ताधारी पॅनेलमधून इच्छुकांची भाऊगर्दी; उमेदवारीसाठी आमदारांची लागणार कसोटी.
31 May, 2026
कोरेगाव : जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:
कोरेगाव नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. संभाव्य नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या नावांची चर्चा रंगू लागली असून, यामध्ये राहुल प्रकाश बर्गे जिल्हा नियोजन सदस्य आणि सुनील दादा बर्गे या 'बर्गे बंधूंची' नावे आघाडीवर आहेत. आमदार महेश शिंदे यांचे अत्यंत विश्वासू, निष्ठावंत आणि निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून या दोन्ही नेत्यांकडे पाहिले जाते.
राहुल प्रकाश बर्गे: विकासकामांचा धडाका आणि जनसंपर्क
राहुल प्रकाश बर्गे हे सध्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. कोरेगाव शहरासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राजकीय वर्तुळात त्यांची चर्चा आहे. कोरेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढत्या प्रभावाला चोख प्रत्युत्तर देण्याचे काम राहुल बर्गे यांनी प्रभावीपणे केल्याचे मानले जाते. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेल्या जवळिकीमुळे मतदारसंघात त्यांची मजबूत पकड निर्माण झाली आहे.
सुनील दादा बर्गे: कामाचा अनुभव आणि 'आदर्श नगरसेवक' प्रतिमा
दुसरीकडे, सुनील दादा बर्गे, उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक ,संस्थापक व अध्यक्ष सुभाषनगर नवरात्र उत्सव मंडळ कोरेगाव यांनी आपल्या प्रभागात केलेल्या विकासकामांमुळे स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नगरसेवक म्हणून कार्यरत असतानाच त्यांनी उपनगराध्यक्षपदाची जबाबदारीही प्रभावीपणे सांभाळली आहे. कोरेगावमधील सुभाषनगर परिसरात त्यांनी राबविलेल्या विविध विकासकामांची शहरात विशेष चर्चा असते. प्रांत कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार उभारलेले सुंदर दुर्गादेवी मंदिर, परिसरातील काँक्रिटीकरण, तसेच पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था या कामांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आत्मीयता आहे.
सुनील दादा बर्गे यांच्याकडे कोरेगाव शहरातील एक 'आदर्श नगरसेवक' म्हणून पाहिले जात असून, त्यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळावी अशी भावना त्यांच्या समर्थक व मित्रपरिवारातून व्यक्त होत आहे. शहरातील मोठा जनसमुदाय त्यांच्या पाठीशी असल्याचेही बोलले जात आहे.
आमदार महेश शिंदेंची लागणार कसोटी!
कोरेगाव शहरात आमदार महेश शिंदे यांच्या सत्ताधारी पॅनेलमधील अनेक नगरसेवक नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चित करताना आमदार शिंदे यांची मोठी कसोटी लागणार आहे. निवडणुकीला अद्याप ६ ते ७ महिन्यांचा कालावधी शिल्लक असला, तरी सर्व इच्छुक नगरसेवकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
सध्या शहरात विविध सामाजिक कार्यक्रम, लग्नसोहळे, साखरपुडा कार्यकर्त्यांच्या वाढदिवसांना हजेरी लावून इच्छुक नगरसेवक नागरिकांशी थेट संपर्क वाढवत आहेत. यामुळे कोरेगावचे राजकीय वातावरण ऐन उन्हाळ्यात ४१° वर तापत चालले आहे,असं राजकीय पडघम आता पासूनच वाजायला लागले आहे, हि कोरेगाव नगर पंचायत निवडणूक दिवसेंदिवस अधिकच रंगतदार बनत चालले आहे.
उत्सुकता शिगेला: राजकीयदृष्ट्या प्रभावी मानल्या जाणाऱ्या या बर्गे बंधूंनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आपापली व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. आमदार महेश शिंदे यांच्या गळ्यातील ताईत म्हणून राहुल बर्गे आणि सुनील बर्गे या दोघांकडेही पाहिले जाते. त्यामुळे नगराध्यक्षपदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार—राहुल प्रकाश बर्गे की सुनील दादा बर्गे?—या प्रश्नाने कोरेगाव शहरात उत्सुकता ताणली गेली आहे. आपल्या दोन्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांपैकी कोणाची निवड करायची, यावरून आमदार महेश शिंदे यांना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. नगराध्यक्षपदासाठी सचिन बर्गे, राहुल रघुनाथ बर्गे, बच्चू शेठ ओसवाल, असे अनेक नगरसेवक इच्छुक आहेत.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय