single-post

​थेट जनसंपर्कावर भर; प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या भेटीगाठी; नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीची चर्चा रंगली

कोरेगाव नगरपंचायत निवडणूक: उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांच्या वाढत्या जनसंपर्काने राजकीय वातावरण तापले!

27 May, 2026

​कोरेगाव : जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:

आगामी काळात होऊ घातलेल्या कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. निवडणुकीच्या अधिकृत तारखा अद्याप जाहीर झाल्या नस तरी, उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांनी आपल्या जनसंपर्क मोहिमेला कमालीचा वेग दिला आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये सातत्याने नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यांच्या या वाढत्या सक्रियतेमुळे आगामी निवडणुकीत ते नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार असणार, अशी जोरदार चर्चा आता स्थानिक राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

​कोरेगाव शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून विकासकामे, सुरळीत पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा यांसारख्या विविध नागरी प्रश्नांवरून नागरिकांमधून सातत्याने मागण्या होत आहेत. या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांनी स्वतः प्रत्येक वार्डात जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या थेट संवादामुळे अनेक प्रभागांतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांच्या तत्पर कार्यपद्धतीचे सर्वसामान्य जनतेतून कौतुक होताना दिसत आहे.

​आजारी व्यक्तींची विचारपूस अन् वैद्यकीय मदत

​ म्हणजे, राहुल बर्गे हे केवळ राजकीय बैठका किंवा जाहीर कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता, शहरातील आजारी नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस करत आहेत. आजारपणात धीर देत आवश्यक ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न ते करत असल्याने सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. अनेक गरजू कुटुंबांना वैद्यकीय मदत मिळवून देणे, शासकीय योजनांची माहिती पोहोचवणे तसेच नगरपंचायतीशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराची चर्चा सध्या शहरभर सुरू आहे.

​विरोधक चाचपणीत, बर्गे मैदानात!

​नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्ष आणि स्थानिक आघाड्यांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असताना, राहुल बर्गे यांनी मात्र थेट 'जनतेच्या दारात' जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांशी संवाद साधत त्यांनी प्रशासकीय पातळीवर नागरी प्रश्नांचा पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांच्या या आक्रमक रणनीतीमुळे समर्थकांमध्ये कमालीचा उत्साह असून, आगामी निवडणुकीत ते एक अत्यंत प्रभावी चेहरा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

​राजकीय समीकरणे बदलणार?

​राजकीय जाणकारांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये थेट जनसंपर्क आणि जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारे नेतृत्व नेहमीच सरस ठरते. राहुल बर्गे यांनी नेमकी हीच नाडी ओळखून आपली रणनीती आखल्याचे दिसते.

​दुसरीकडे, इतर इच्छुक उमेदवारांनीही आपापल्या स्तरावर मोर्चेबांधणी सुरू केली असली, तरी बर्गे यांच्या झंझावाती दौऱ्यांमुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत येथील राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची दाट शक्यता आहे.