single-post

रयतच्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कोरेगावच्या संपदा जगतापचे यश

डी. पी. भोसले महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; ५ हजार रुपयांचे पारितोषिक

23 January, 2026

रयतच्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कोरेगावच्या संपदा जगतापचे यश

डी. पी. भोसले महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; ५ हजार रुपयांचे पारितोषिक

 कोरेगाव दि.२३ (जरंडेश्वर समाचार वृत्तसेवा): रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित 'पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत' कोरेगाव येथील डी. पी. भोसले महाविद्यालयाच्या कु. संपदा संतोष जगताप हिने उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक पटकावला. या घवघवीत यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक लौकिकात मानाचा तुरा खोवला गेला असून, तिला ५ हजार रुपये रोख आणि आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील नामवंत वक्ते आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील वाढता स्तर आणि तगडी स्पर्धा असतानाही, संपदाने विषयाची सखोल मांडणी, प्रभावी भाषाशैली, आशयघन विचार आणि सुस्पष्ट उच्चार यांच्या जोरावर परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

संपदा ही महाविद्यालयाच्या पदव्युत्तर मराठी विभागाची विद्यार्थिनी आहे. आपल्या या यशाचे श्रेय तिने मराठी विभागप्रमुख आणि मार्गदर्शक डॉ. देवानंद सोनटक्के यांना दिले आहे. वक्तृत्व कौशल्य विकासासाठी सरावाचे महत्त्व आणि डॉ. सोनटक्के यांनी वेळोवेळी दिलेली प्रेरणा यामुळेच हे यश संपादन करता आले, अशी भावना तिने व्यक्त केली.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. कदम यांनी संपदा जगताप व मार्गदर्शक डॉ. देवानंद सोनटक्के यांचे विशेष अभिनंदन केले. "रयत शिक्षण संस्थेचे विचार आणि महाविद्यालयाची शैक्षणिक परंपरा यांतून असे गुणवंत विद्यार्थी घडत आहेत," अशा शब्दांत प्राचार्यांनी गौरव केला.

​या यशामुळे डी. पी. भोसले महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या गुणवत्तेचा ठसा राज्यस्तरावर उमटला असून, अन्य विद्यार्थ्यांनाही यामुळे प्रेरणा मिळाली आहे. संपदाच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.