single-post

सातारा जिल्हा परिषदेचा 'महासंग्राम

जिल्ह्यातील बड्या प्रस्थांच्या अस्तित्वाची आणि वर्चस्वाची लढाई

24 January, 2026

सातारा जिल्हा परिषदेचा 'महासंग्राम'

जिल्हा परिषद रणांगणात बलाढ्य आमनेसामने; २० गटांत अटीतटीची झुंज

मंत्री, खासदार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला; पक्षांतर-बंडखोरीने राजकारण तापले

सातारा | जरंडेश्वर समाचार वृत्तसेवा:-

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे राजकारण अक्षरशः उफाळून आले आहे. उमेदवारी डावलल्याच्या रागातून अनेकांनी क्षणात पक्षांतर करत दुसऱ्या पक्षाचा गमछा गळ्यात अडकवला, तर अनेकांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, अनुभवी सदस्य एकमेकांविरोधात उभे ठाकले असून ६५ पैकी तब्बल २० जिल्हा परिषद गटांत तगडी आणि प्रतिष्ठेची लढत उभी राहिली आहे.

या लढतींमध्ये जिल्ह्यातील चार मंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार यांची राजकीय ताकद आणि वर्चस्वाची कसोटी लागणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक ठरत असल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषदेच्या ६५ तर पंचायत समितींच्या १३० गणांसाठी निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून, हजारो उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. छानणीनंतरही अनेक ठिकाणी अर्जांची संख्या मोठीच असून २७ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज कायम राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघांत बहुरंगी आणि चुरशीच्या लढती निश्चित झाल्या आहेत.

फलटण : राजे विरुद्ध राजे, राजकीय सामना पुन्हा रंगात

फलटण तालुक्यात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या गटांत पुन्हा एकदा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. राष्ट्रवादीतील काही स्थानिक नेत्यांनी भाजपला अप्रत्यक्ष रसद दिल्याने समीकरणे बदलली आहेत.

कोळकी गटात दिवंगत आमदार चिमणराव कदम यांचे चिरंजीव सह्याद्री कदम यांना राजे गटातर्फे शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली असून, त्यांच्या विरोधात रणजितसिंह निंबाळकरांचे निकटवर्तीय भाजप सरचिटणीस जयकुमार शिंदे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ही लढत अटीतटीची ठरणार आहे.

शिरवळ–भुईंज : पक्षांतर आणि बंडखोरीची रणधुमाळी

शिरवळ गटात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, याच गटात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करत कबुले यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. “अन्यायाविरोधात लढण्यासाठी भाजपचा झेंडा हाती घेतला,” असे त्यांनी स्पष्ट केल्याने या गटात मोठी फाईट होणार आहे.

भुईंज गटात माजी सदस्य दिलीप बाबर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे. त्यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीने किसनवीर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांना ऐनवेळी मैदानात उतरवले आहे. हा गट ओबीसीसाठी राखीव असल्याने लढत आणखी गुंतागुंतीची बनली आहे.

बावधन–यशवंतनगर : जुने वैर विसरून नवी आघाडी

काँग्रेसचे माजी जिल्हा युवक अध्यक्ष विराज शिंदे यांच्याशी असलेले राजकीय वैर बाजूला ठेवत राष्ट्रवादीने त्यांच्या पत्नी ऋतुजा शिंदे यांना बावधन गटातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांच्या कन्या दिप्ती पिसाळ यांना मैदानात उतरवले असून, ही लढत विशेष लक्षवेधी ठरणार आहे.

यशवंतनगर गटात बापूसाहेब शिंदे विरुद्ध भाजपचे रोहित वाडकर असा सामना रंगला असून येथेही तगडी झुंज होणार आहे.

सातारा तालुका : राष्ट्रवादी–भाजप थेट संघर्ष

पाटखळ, लिंब, खेड, कोडोली गटांमध्ये अपक्ष उमेदवारी, बंडखोरी आणि पक्षीय रस्सीखेच सुरू आहे. कोडोली गटातून अध्यक्षपदाचा उमेदवार मिळण्याची शक्यता असल्याने येथे संघर्ष टोकाला गेला आहे.

या सर्व लढतींमध्ये खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. महेश शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जावली–कराड–खटाव : वजनदार नेते आमनेसामने

जावलीतील म्हसवे गटात भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) असा थेट सामना आहे. कराड तालुक्यात रेठरे बुद्रूक, येळगाव, पाल गटांत पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा आमनेसामने आले आहेत.

खटावमधील औंध गट जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा दावेदार ठरत असल्याने येथेही राज्यस्तरीय नेत्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

माण–महाबळेश्वर–कोरेगाव : घराघरांत राजकीय संघर्ष

माण तालुक्यात कुकुडवाड व मार्डी गटांत नातेसंबंधांमध्येच थेट लढती होत असून, महाबळेश्वरच्या तळदेव गटात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत आहे.

कोरेगावच्या एकंबे गटात भोसले कुटुंबातील दोन गट आमनेसामने ठाकले असून ही लढत जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेची ठरण्याची शक्यता आहे.


सातारा जिल्हा परिषद निवडणूक ही विकासापेक्षा वर्चस्व, प्रतिष्ठा आणि राजकीय ताकदीची लढाई ठरत आहे. कोणाचा बालेकिल्ला शाबूत राहतो आणि कोणाची पकड सैल होते, हे मतपेटीतून स्पष्ट होणार असून, या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.