single-post

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी

डॉ. संजयकुमार सरगडे, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा

21 February, 2025

बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने दलित साहित्याचा सशक्त प्रवाह जन्माला आला. फुले, शाहू, आंबेडकर या विचारधारेशी एकरूप असणारे अनेक लोक लिहू लागले, वाचू लागले. कथा, काव्य ,कादंबरी, नाटक , चरित्र, आत्मचरित्र अशा विविध अंगी साहित्य प्रकाराने मराठी भाषा सर्वश्रेष्ठ ठरली आहे. समाजातील  दलित, उपेक्षित, शोषित , वंचित , कष्टकरी, मजूर, कामगार, सर्वसामान्यांचे जीवन लेखणीत शब्दबद्ध करून अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्य क्षेत्रात क्रांती केली. 

 ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय जाहीर झाला. भाषा प्राचीन असावी त्या भाषेतील साहित्य श्रेष्ठ असावे, भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे, भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षाचे असावे हे निकष पूर्ण करणारी मराठी भाषा अभिजात भाषा ठरली ही गोष्ट मराठी भाषिकांसाठी अभिमानाची आहे. यावरूनच मराठी भाषेची महती लक्षात येते.
     
 मराठी भाषेच्या उगमापासून ते आजच्या आणि सध्याच्या मराठी भाषेच्या स्वरूपात अनेक बदल हे कालपरत्वे झाले. कोणतीही भाषा एकजिनसी असत नाही. परकीय आक्रमणे, राज्यक्रांती, दुष्काळ, भूकंप, महापूर , युद्धे , रोगराई, वैचारिक व धर्मक्रांती अशा अनेक कारणांनी समाजमन ढवळून निघत असते. त्याचा परिणाम मराठी भाषेवर होताना मराठी भाषाही हळूहळू बदलत गेली. असे असले तरी विविध ज्ञानपीठ, साहित्य अकादमी पुरस्कार, शासन स्तरावरील पुरस्कार, विविध संस्था यांचे पुरस्कार, भाषा संचालनालय,महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य संमेलने अशा विविध  ज्ञात अज्ञात संस्था या मराठी भाषेचा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व्हावा तसेच मराठी भाषेच्या अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करावी यासाठी  मराठी भाषा संवर्धनासाठी राबविलेले विविध उपक्रम मराठी भाषेच्या समृद्धीच्या दिशेने टाकलेली मोठी पाऊले आहेत. 

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या आणि माध्यमांच्या जगात मराठी भाषा आपले अस्तित्व  राखून आहे. आज मराठी भाषेवर इतर भाषांची किती आक्रमणे झाली तरीही मराठी भाषेवर त्याचा फारसा परिणाम न होता उलट तिची वाटचाल समृद्ध दिशेने सुरू आहे....
  लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
हा कविवर्य सुरेश भट यांनी मराठी मनात जागवलेला अभिमान चिरंतन राहील.