पराभवातही संघर्षाचे तेज; भाजपाचा विजय डागाळलेला!’
मुंबईत 'मॅजिक फिगर' हुकली असली तरी उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार; निवडणूक प्रक्रियेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न?
17 January, 2026
पराभवातही संघर्षाचे तेज; भाजपाचा विजय डागाळलेला!’
मुंबई | विशेष प्रतिनिधी महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात ठिणगी पडली आहे. मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला ६५ जागा मिळाल्या असून, सत्तास्थापनेसाठी आवश्यक बहुमत गाठता आलेले नाही. मात्र, या निकालावर भाष्य करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "आमचा पराभव झाला असे मला वाटत नाही, उलट आमच्या पराभवाला संघर्षाचे तेज आहे आणि भाजपाचा विजय हा यंत्रणांच्या गैरवापराने डागाळलेला आहे," अशा शब्दांत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली.
यंत्रणांचा गैरवापर आणि पैशांचा पाऊस
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेवर अत्यंत गंभीर आरोप केले. सत्ताधाऱ्यांनी ही निवडणूक लोकशाही मार्गाने नाही, तर 'साम-दाम-दंड-भेद' वापरून लढल्याचा दावा त्यांनी केला. "निवडणूक ही जीवन-मरणाची लढाई असल्यासारखे वातावरण निर्माण केले गेले. मतदारांना पैशांची आमिषे दाखवली गेली, धमक्या दिल्या गेल्या आणि दबाव तंत्राचा वापर झाला. प्रेशर कुकरपासून साड्यांपर्यंत वाटप झाले, हा पैसा येतो कुठून?" असा सवाल त्यांनी जनतेसमोर उपस्थित केला.
रिकाम्या खुर्च्या अन् मतदानाचे अनाकलनीय 'गणित'
सभांना होणारी गर्दी आणि प्रत्यक्ष निकाल यातील तफावतीवर ठाकरेंनी बोट ठेवले. "विधानसभेला मोदींच्या सभा झाल्या, आता फडणवीसांच्या सभा झाल्या; मात्र त्या सभांमध्ये खुर्च्या रिकाम्या होत्या. याउलट माझ्या आणि राज ठाकरेंच्या सभांना जनसागर उसळला होता. तरीही मतदानाचे गणित सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कसे झुकले, हे अनाकलनीय आहे," असे सांगत त्यांनी निकालाच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली.
"कागदावरची शिवसेना संपवाल, जमिनीवरची कशी संपवणार?" > भाजपावर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले की, "तुम्ही कागदावरची शिवसेना फोडून स्वतःच्या बाजूला घेतली असेल, पण जमिनीवरची शिवसेना आजही आमच्यासोबतच आहे. जर भाजपाला स्वतःच्या ताकदीवर विश्वास असता, तर त्यांना यंत्रणांचा गैरवापर करावा लागला नसता किंवा दुसऱ्यांचे नेते फोडावे लागले नसते."
कार्यकर्त्यांची माफी आणि मतदारांचे आभार
सर्व महापालिकांमध्ये प्रचाराला जाऊ शकलो नाही, याची कबुली ठाकरेंनी यावेळी दिली. मुंबई, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर वगळता इतर ठिकाणी पोहोचता आले नाही, त्याबद्दल त्यांनी शिवसैनिकांची दिलगिरी व्यक्त केली. "ज्यांनी दबावाला बळी न पडता शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीला मतदान केले, तेच खरे लोकशाहीचे रक्षक आहेत," असे ते म्हणाले.
मुंबईकरांचा कौल शिरसावंद्य
कोविड काळात केलेल्या कामामुळे मुंबईकरांकडून अधिक मोठ्या विजयाची अपेक्षा होती, असे नमूद करत ठाकरे म्हणाले की, "मुंबईकरांनी जे दिले आहे, ते समाधानकारक आहे. भाजपाची वृत्ती 'वापरा आणि फेकून द्या' अशी आहे. आज जे त्यांच्यासोबत सत्तेत आहेत, त्यांनाही भविष्यात भाजपा संपवल्याशिवाय राहणार नाही," असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
मुंबईतील ६५ जागांच्या बळावर उद्धव ठाकरे यांनी आपली 'टफ फाईट' सिद्ध केली आहे. मात्र, बहुमताचा आकडा गाठण्यात आलेले अपयश आणि भाजपाने मारलेली मुसंडी यामुळे आगामी काळात मुंबई महापालिकेतील सत्तासंघर्ष न्यायालय किंवा फोडाफोडीच्या राजकारणापर्यंत जाण्याची चिन्हे आहेत.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय