मंत्रालयात सुरूर–वाई–महाबळेश्वर–पोलादपूर मार्गाचा उच्चस्तरीय आढावा
वाहतूक कोंडी कमी करण्यासह पर्यटन विकासाला चालना देण्यावर भर
21 May, 2026
मुंबई | जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा: महाबळेश्वर, पाचगणी आणि वाई परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करून पर्यटनाला गती देण्यासाठी सुरूर–वाई–महाबळेश्वर–पोलादपूर रस्ता प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. घाटरस्त्यांचे रुंदीकरण, पर्यायी मार्गांची निर्मिती आणि पायाभूत सुविधा सक्षम करण्याबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
या बैठकीत महाबळेश्वर व पाचगणी घाट परिसरातील वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पर्यटकांना सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
घाट परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण, पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी गटारांची कामे आणि रस्ते सुरक्षाविषयक उपाययोजना वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. तसेच शिंदेवाडी फाटा–वरंधा घाट या महत्त्वपूर्ण मार्गाच्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन कामाला गती देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
महाबळेश्वर, पाचगणी, धोम धरण व परिसरातील पर्यटन विकासासाठी मजबूत रस्ते जाळे उभारण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. या प्रकल्पांमुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद जाधव-पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) शरद राजभोज, महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी, मुख्य अभियंता (पुणे) प्रज्ञा वाळके, उपसचिव शैलेश बोरसे उपस्थित होते.
तसेच सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीपाद जाधव, भरत बाविस्कर तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सचिव संतोष शेलार आणि कार्यकारी अभियंता दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय