१९७२ च्या दुष्काळात मुकादम म्हणून सेवा देणारे कै. पोपट तात्याबा रणदिवे यांचे निधन
बुधवारी दि.२१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी९ वा. सावडण विधी व दहाव्यांचा कार्यक्रम;एक प्रेमळ वडील व जबाबदार कुटुंबप्रमुख हरपला
20 January, 2026
शेंदुजर्णे (ता.२० कोरेगाव) | प्रतिनिधी:
शेंदुजर्णे, तालुका कोरेगाव येथील कै. पोपट तात्याबा रणदिवे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शेंदुजर्णे परिसरात हळहळ व्यक्त होत असून एक कष्टकरी, प्रामाणिक व समाजाशी नाळ जपणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
कै. पोपट तात्याबा रणदिवे हे अत्यंत मेहनती व उत्तम शेतकरी म्हणून परिसरात परिचित होते. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असला तरी काळाची गरज ओळखून त्यांनी जोडधंद्यालाही महत्त्व दिले. पारंपरिक व्यवसायासोबतच गाई, म्हशी व शेळीपालनाचा व्यवसाय त्यांनी यशस्वीपणे सांभाळला. कष्ट, शिस्त व चिकाटी यांच्या जोरावर त्यांनी आपला संसार समर्थपणे उभा केला.
सन १९७२ च्या भीषण दुष्काळानंतर पाझर तालावर मुकादम म्हणून त्यांनी जबाबदारीने कार्य केले. त्या काळात त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत पूर्ण झालेले होते. शिक्षण, अनुभव व प्रामाणिकपणा यांच्या बळावर त्यांनी दिलेली सेवा आजही अनेकांच्या स्मरणात आहे. कठीण परिस्थितीतही कामाशी प्रामाणिक राहणे व लोकांशी आपुलकीने वागणे हे त्यांचे ठळक वैशिष्ट्य होते.
एक कर्तव्यदक्ष पती, प्रेमळ वडील आणि जबाबदार कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी आपली सर्व कर्तव्ये निष्ठेने पार पाडली. त्यांच्या संस्कारातूनच त्यांच्या कुटुंबाला योग्य दिशा मिळाली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, एक मुलगी, नातवंडे , एक भाऊ व एक बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने रणदिवे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.
बुधवार, दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता त्यांच्या सावडण (सावटन) विधी व दहावांचा कार्यक्रम शेंदुजर्णे येथे होणार आहे.
कै. पोपट तात्याबा रणदिवे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
या दुःखद प्रसंगी रणदिवे परिवाराच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत व त्यांच्याप्रती मनःपूर्वक सहवेदना व्यक्त करीत आहोत.
शोकाकुल : रणदिवे परिवार, बोतालजी परिवार शेंदुजर्णे

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय