single-post

सहकार महर्षी ते लोकनेते: स्वर्गीय लक्ष्मणराव तात्या पाटील यांच्या ध्येयनिष्ठ पर्वाचे स्मरण

सत्तेच्या प्रवासातील 'दशकांचा' अनुभव: ​“सरपंच ते खासदार: सत्तेच्या प्रत्येक पदाला न्याय देणारा १०-१० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव!”

18 January, 2026

सहकार महर्षी ते लोकनेते: स्वर्गीय लक्ष्मणराव तात्या पाटील यांच्या ध्येयनिष्ठ पर्वाचे स्मरण !

स्वर्गीय खा. लक्ष्मणराव (तात्या) पाटील : सरपंच ते खासदार... पाच दशकांचा झंझावाती लोकसंग्रह

सातारा | प्रतिनिधी

सातारा जिल्हा म्हणजे शाहू-फुले-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची प्रयोगशाळा. सामाजिक परिवर्तन, सहकार आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणाऱ्या या मातीत अनेक नेतृत्वे घडली, पण विचार आणि कृती यांचा सुवर्णसंगम साधणारे नाव म्हणजे स्वर्गीय खासदार लक्ष्मणराव ऊर्फ तात्या पाटील. आज त्यांच्या स्मृतिदिनी, त्यांनी उभ्या केलेल्या संस्थात्मक आणि वैचारिक साम्राज्याचा आढावा घेणे म्हणजे एका ध्येयनिष्ठ पर्वाचे स्मरण करणे होय.

दशकानुदशकांचे तप:पूत नेतृत्व

​तात्यांच्या राजकीय प्रवासाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ज्या संस्थेची जबाबदारी स्वीकारली, तिथे त्यांनी केवळ काळ घालवला नाही, तर एक 'युग' निर्माण केले. सत्तेच्या सोपानावर चढताना त्यांनी प्रत्येक टप्प्यावर किमान १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव घेतला:

  • ग्रामविकास: १० वर्षे सरपंच म्हणून बोपेगावचा कायापालट.
  • सहकार: १० वर्षे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नेतृत्व करून ग्रामीण अर्थकारण सावरले.
  • कृषी उद्योग: १० वर्षे साखर कारखान्याचे अध्यक्षपद भूषवत शेतकऱ्यांचे हित जोपासले.
  • विपणन: १० वर्षे खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून शेतमालाला प्रतिष्ठा दिली.
  • प्रशासन: १० वर्षे जिल्हा परिषदेत सदस्य व अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचा विकास आराखडा राबवला.

कृतज्ञतेचे राजकारण : स्मारके हीच ओळख

​नेतृत्व म्हणजे केवळ सत्तास्थान नव्हे, तर पुढील पिढीपर्यंत विचार पोहोचवण्याची जबाबदारी असते, यावर तात्यांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच स्वातंत्र्यसैनिक किसन वीर यांच्याबद्दलची निष्ठा त्यांनी केवळ भाषणातून नाही, तर कृतीतून सिद्ध केली. सातारा सहकारी साखर कारखान्याला 'किसन वीर' नाव देणे, त्यांचे स्मारक उभारणे आणि सातारा शहराच्या केंद्रस्थानी (पोवई नाका) यशवंतराव चव्हाण व किसन वीर यांचे भव्य पुतळे उभारण्यात तात्यांचा सिंहाचा वाटा होता.

विकासनगर : कार्यकर्त्यांचा 'आधारवड'

​तात्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे विलक्षण कडवेपणा आणि तितकाच अपार जिव्हाळा यांचा संगम होता. त्यांचे 'विकासनगर' येथील निवासस्थान म्हणजे जिल्ह्याचे अनौपचारिक मुख्यालयच होते. घराचे दरवाजे कार्यकर्त्यांसाठी अहोरात्र उघडे असायचे. कार्यकर्ता कोणत्याही वेळी येवो, चहा आणि कामाची सोडवणूक झाल्याशिवाय तो परत जात नसे. या प्रचंड व्यापात तात्यांच्या पत्नी सुमनताई (काकी) यांनी कार्यकर्त्यांना मायेचा आधार देत या घराचे 'गोकुळ' केले.

राष्ट्रवादीचा पाया आणि समर्थ वारसा

​१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर साताऱ्यात पक्षाचा झेंडा सर्वप्रथम खांद्यावर घेणारे तात्याच होते. आज त्यांचा हाच वारसा त्यांचे चिरंजीव ना. मकरंद पाटील (मंत्री, महाराष्ट्र राज्य) आणि खा. नितीन लक्ष्मण पाटील (लोकसभा सदस्य) समर्थपणे पुढे नेत आहेत. एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांनी जनसेवेचे व्रत अशाच निष्ठेने सुरू ठेवणे, हे तात्यांनी केलेल्या संस्कारांचे यश आहे.

१९६० च्या सरपंचपदापासून सुरू झालेली ही वाटचाल संसदेपर्यंत पोहोचली, तरी तात्यांचे पाय जमिनीवरच राहिले. यशवंतराव चव्हाण आणि किसन वीर यांच्या विचारांची साखळी नव्या पिढीशी जोडणारा हा पोलादी दुवा आजही साताऱ्याच्या जनमानसात कायम आहे. अशा या लोकसंग्रहक नेत्यास विनम्र अभिवादन!

- शब्दांकन: सुरेश बोतालजी

(संपादक: साप्ताहिक जरंडेश्वर समाचार)