दलित महासंघ,लाल सेना यांचा दि.२५ मार्च ला मांगवीर महामोर्चा
मुख्यमंत्र्यांची भेट, बदर समितीची मुदतवाढ समज गैरसमज-डॉ.प्रा.मच्छिंद्र सकटे
20 February, 2025
कराड दि.२०(प्रतिनिधी) महाराष्ट्रातील समाज बांधवांनो, दि.१ ऑगस्ट२०२४ रोजी सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने जो निकाल दिला आहे, त्या निकालाची महाराष्ट्र सरकारने अंमलबजावणी करावी, बनावट जात प्रमाणपत्र घेऊन बिगर अनुसूचित जातीतील जे लोक अनुसूचित जातीच्या आरक्षित जागा हडप करीत आहेत त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी, याबरोबरच मातंग समाजाच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात दलित महासंघ व लाल सेना आणि महाराष्ट्रातील सुमारे २५ संघटना एकत्र येऊन ५ मार्च २०२५ रोजी शहीद संजय ताकतोडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दलित महासंघ ,लाल सेना प्रमुख कार्यकर्ते यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर "मांगवीर महामोर्चा" चे आयोजन केले आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी मी दोन-तीन दिवस पुण्यामध्येच होतो. विविध संघटनांच्या प्रमुखांना भेटण्याबरोबरच आजी-माजी आमदार, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेण्याचा माझा कार्यक्रम सुरू होता. शिवजयंतीच्या निमित्ताने, बुधवार, दि.१९ फेब्रुवारी २०१९ रोजी कदाचित भेट होईल म्हणून मी आमदार अमित गोरखे यांना फोन केला, तर त्यांनी मला "आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येत आहेत. मी तेथेच आहे, तुम्हीही या" असे मला गोरे यांनी सांगितल्यामुळे, मी आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या ठिकाणी पोहोचलो.
त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर मी त्यांना म्हणालो की, " साहेब, न्यायमूर्ती बदर समितीचे काम थंड असल्यामुळे मातंग समाजामध्ये फार मोठा असंतोष आहे"... त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की, "न्यायमूर्ती बदर समितीला आपण आठ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.".. अर्थात ही मुदतवाढ मी दिलेली नाही, तर ती मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने दिली आहे. मला जे मुख्यमंत्र्यांनी सांगितले ते मी महाराष्ट्राला सांगितले... यावर वावटळ उठवण्याची काही गरज नव्हती,
ही मुदतवाढ मी मागितलेली नाही , मी दिलेली नाही. ही मुदतवाढ न्यायमूर्ती बदर समितीनेच एक महिन्यापूर्वी मागितली होती. त्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी संमती दिली... असे मुख्यमंत्री यांनी माझ्याजवळ सांगितले आणि तेच मी महाराष्ट्राला सांगितले. बस एवढंच झालंय..
कृपा करून, गैरसमज करून घेण्यापूर्वी कोणत्याही गोष्टीची खात्री करावी असे माझे मत आहे. परंतु काही लोक सातत्याने आमच्या भूमिकेला विरोध करीत आहेत. मांगवीर महामोर्चाचे आयोजन केल्यापासून काही लोक सोशल मीडियावर आमच्याविषयी गैरसमज पसरवित आहेत. समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे कारस्थान करीत आहेत. तेव्हा, माझी महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे की, मच्छिंद्र सकटे आणि गणपत भिसे आणि महामोर्चाला सपोर्ट करणारे सर्व नेते यांचा इतिहास तपासा, आमचे काम तपासा, आमचे लेखन, वाचन, चिंतन तपासा...आमच्या संघर्षाची ओळख करून घ्या... आणि त्यानंतर कुठल्याही गोष्टीवर मत बनवा...!!!असे आवाहन डॉ.प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी केले आहे.
मातंग समाजाच्या भावी पिढ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आम्ही हा "मांगवीर महामोर्चा" घेऊन आझाद मैदानावर धडक मारत आहोत. आपण सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी व्हा. नकारात्मक विचार मांडू नका. सदैव सकारात्मक रहा. समज - गैरसमज याच्या पलीकडे आपले प्रश्न आहेत हे समजून घ्या. त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण एकसंघपणे लढणे हाच एकमेव पर्याय आहे.
कृपया, साथ करा, मांगवीर महामोर्चात सहभागी व्हा...असे निवेदन त्यांनी समाज बांधवांना केले आहे.